पुणे : पुण्यातील देवाची आळंदी परिसरातुन एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका महिलेने आपल्या पतीच्या विरहात आयुष्याचा शेवट केला आहे.कॅन्सरमुळे पती शेवटची घटका मोजत होता. हे लक्षात येताच पत्नीने देखील त्याचा विरह नको म्हणून इंद्रायणी नदीच्या डोहात उडी घेऊन आपलं आयुष्य संपवल आहे. या घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, गंगाधर चक्रावार (वय ६५) आणि गंगाणी उर्फ मंगल चक्रावार (वय ५५) अशी मृत पती – पत्नीची नावं आहेत. चक्रावार दांम्पत्य हे नांदेड शहरातील चौफाळा येथील रहिवासी आहेत. काही वर्षांपूर्वी दोघेही आळंदी येथील गुरु किशन महाराज साखरे यांच्या सानिध्यात आले. भक्तिमार्गाला लागल्यानंतर ते आळंदीत वास्तव्याला आले. मागील काही दिवसापासून पंढरीनाथचक्रावार यांना कॅन्सरसारख्या गंभीर आजारांन ग्रासलं होतं त्यांच्यावर पुणे येथील खाजगी रुग्णालयात उपचार देखील सुरू होते. मात्र प्रकृती सुधारणा होत नसल्याने डॉक्टरांनी त्यांना घरी नेण्यास सांगितले. त्यानुसार गंगाणी पतीला घरी घेऊन आल्या,शनिवारी पती आयुष्याचे शेवटचे श्वास मोजत होते. पतीचा मृत्यू होणार याची कल्पना आल्यानंतर गंगाणी यांनाही विरह सहन झाला नाही. शनिवारी दुपारी साखरे महाराजांच्या मठात दर्शनासाठी जात असल्याचं सांगून त्या घराबाहेर पडल्या. त्यांनी माऊलींचं दर्शन घेतलं. नंतर इंद्रायणी नदीत उडी घेऊन स्वतःला संपवत आत्महत्येचं टोकाचं पाऊल उचललं. दरम्यान मृत्यू आधी मी देवदर्शनाला जात असल्याचा मोबाईलमध्ये स्टेटस देखील त्यांनी ठेवला होता.
दरम्यान चक्रावार दाम्पत्यांना तीन मुले आणि एक मुलगी आहे. आई घराबाहेर पडल्यानंतर तिथे घरात वडिलांनी देखील अखेरचा श्वास घेतला. तिकडे आई घरी न आल्याने मुलांनी शोधाशोध सुरू केली. रात्री उशिरा मुलांना आपल्या आईचा मृतदेह आळंदी येथील इंद्रायणी नदीत आढळ्याची माहिती मिळाली..रविवारी एकाच सरणावर दोघांवर आळंदी येथील नदीच्या काठावर अंत्यसंस्कार करण्यात आले.