पतंगराव कदम यांच्या कन्या भारती यांचे निधन

0
2

सांगली, दि. २८ : जिच्या पावलांनी डॉ. पतंगराव कदम शिक्षणमहर्षी म्हणून घडले, जिच्यामुळे पतंगरावांनी आपल्या सगळ्या संस्थांना ‘भारती’ नाव दिले, अशा भारतीताई लाड यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. काँग्रेसचे दिवंगत नेते आणि माजी वनमंत्री डॉ. पतंगराव कदम यांच्या कन्या भारती महेंद्र लाड यांनी वयाच्या 53 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.

भारती महेंद्र लाड यांचा जन्म 18 जुलै 1972 रोजी सोनसळ (ता.कडेगांव) येथे झाला. डॉ. पतंगराव कदम यांच्या संघर्षाचा काळ भारतीताईंनी अतिशय जवळून पाहिला होता. त्यामुळे पुढे डॉ. पतंगराव कदम यांनी त्यांच्याच नावे सर्व संस्थांचे जाळे उभे केले. त्यामुळे भारती संकुल आज डौलाने विद्यादानाचे काम करत आहे.

घरात राजकीय आणि सामाजिक वातावरण असले तरी भारतीताई अतिशय साध्या आणि सामान्य लोकांत मिळून मिसळून असत. त्यांचा विवाह 3 मे 1993 रोजी कुंडल (ता. पलूस) येथील सामाजिक कार्यकर्ते आणि उद्योजक असलेले महेंद्र लाड यांच्याशी झाला. जवळच्याच पाहुण्यांतच लग्न झाल्याने त्या इथेही लगेच रुळल्या. त्यांच्या प्रयत्नातून भारती शुगर, डॉ. पतंगराव कदम विद्या संकुल अशा अनेक संस्थांचे जाळे या परिसरात उभे राहिले आहे.

भारतीताई यांनी महिलांच्या समस्यांना वाचा फोडण्यासाठी आणि त्यांना हक्काचे व्यासपीठ उभे करून देण्यासाठी मोठे प्रयत्न केले. महिलांच्या अडीअडचणी सोडवण्यात त्या नेहमी अग्रेसर असत. महेंद्र लाड यांच्यावर जिल्हा बँकेचे संचालक आणि रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष पद अशी जबाबदारी आल्याने गावगाडा आणि महिला सबलीकरणासाठी त्या प्रयत्नशील राहिल्या.