……पण महाराष्ट्राचंही कल्याण करा नाहीतर गुजरातचे मुख्यमंत्री व्हा; शरद पवारांची नरेंद्र मोदींवर जहरी टीका

0
54

मुंबई, दि. 05 (पीसीबी) : दिवाळी संपताच महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात झाली आहे. राष्ट्रवादी शरदचंद्र पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी एका निवडणूक प्रचार सभेमध्ये बोलताना थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केला. “मुख्यमंत्र्यांनी राज्याचा विचार करायचा असतो. पंतप्रधान आणि त्यांच्या सहकाऱ्यांच टाटांशी काय बोलणं काय माहीत नाही. काय जादू झाली माहीत नाही. नागपूरमध्ये विमान बनवण्याचा कारखाना होणार होता. तो गुजरातला नेला” असा टीका शरद पवार यांनी केली. “इथे हाताला काम नाही. मोबाईलची चीप बनवणारी कंपनी फॉक्सकॉनचा कारखाना महाराष्ट्रात करायचा होता. वेदांतवाल्यांना मोदींनी बोलावून घेतलं. काय जादू केली माहीत नाही. तो महाराष्ट्रातील कारखाना गुजरातला नेला. मी गुजरातच्या विरोधात नाही. गुजरातचं कल्याण करा. पण महाराष्ट्राचंही कल्याण करा. महाराष्ट्राचं नुकसान करू नका” असं शरद पवार म्हणाले.

“तुम्ही देशाचे पंतप्रधान आहात. तुम्ही फक्त एका राज्याचं काम करत असाल तर पंतप्रधान कशाला होता? जाऊन तिथे मुख्यमंत्री व्हा. माझी काही तक्रार नाही. पण हे जे काही घडतंय ते राज्याच्या हिताचं नाही. देशाच्या हिताचं नाही. अनेक राज्यात हाताला काम नाही” असं शरद पवार म्हणाले. “इथल्या राज्यकर्त्यांनी इथल्या राज्यातील लोकांच्या हितासाठी जी धमक दाखवायची, ती दाखवत नाहीत. त्याचा परिणाम म्हणजे आमचं काम दुसरीकडे चाललं आहे. ते थांबवायचं असेल तर इथली सत्ता बदलली पाहिजे. सत्ता बदलण्याशिवाय गत्यंतर नाही” असं आवाहन शरद पवार यांनी केलं. “शेतीला पाणी आणि हाताला काम यासाठी अधिक लक्ष देण्याची गरज आहे. तरच सरकारचा दृष्टीकोण चांगला राहतो. दुर्देवाने दिल्ली आणि राज्याचे राज्यकर्ते त्या दृष्टीने काम करत नाहीत” असं शरद पवार म्हणाले.

“मी सत्तेत नाही. राज्यसभेत आहे. अजून माझे दीड वर्ष आहे. दीड वर्षांनंतर राज्यसभेत जायचं की नाही याचा विचार मला करावा लागेल. लोकसभा मी लढणार नाही. कोणतीही निवडणूक लढणार नाही. किती निवडणुका करायच्या. आतापर्यंत 14 निवडणुका केल्या. तुम्ही एकदाही घरी पाठवलं नाही. दरवेळी निवडून देत आहात. त्यामुळे कुठे तरी थांबलं पाहिजे. नवी पिढी समोर आली पाहिजे हे सूत्र घेऊन मी कामाला लागलो आहे” असं शरद पवार म्हणाले.