पक्ष चोरला नाही, कायदेशीर मार्गाने मिळाला – अजित पवार

0
144

बारामती, दि. १६ (पीसीबी) – राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या बालेकिल्ल्यात आज सभा घेत पक्षाच्या कार्यकर्त्यांना संबोधित केले. या वेळी त्यांनी आगामी निवडणुकांविषयी भाष्य करतानाच, नुकतंच विधानसभा अध्यक्षांनी दिलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या निर्णयावरही भाष्य केले. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर नाव न घेताच अप्रत्यक्षपणे टीका केली.

अजित पवार म्हणाले, “आमच्यावर आरोप केला जातो की आम्ही पक्ष चोरला, पण पक्ष आम्हाला रितसर-कायदेशीर मार्गाने मिळाला आहे. काल, आज आणि उद्याही आम्ही राष्ट्रवादी आहोत, आम्ही पक्ष चोरला नाही. माझा परिवार सोडला तर इतर सर्व घरांतील विरोधात प्रचार करतील. मला कुटुंबातील एकटे पाडण्याचा प्रयत्न करतील, पण आपल्याला राष्ट्र्वादी काँग्रेसला विजयी करायचं आहे.”

अजित पवार म्हणाले, “आठ लाखांच्या आत उत्पन्न असणाऱ्या सर्व मुलींना आता मोफत शिक्षण मिळणार, असा ऐतिहासिक निर्णय आपल्या सरकारने घेतला आहे. महाराष्ट्रामधील अनेक अध्यक्ष आमच्या बरोबर आले आहेत. काम करणाऱ्यावरच रोज आरोप केले जातात. माझा दावा तर असा आहे की, बारामती तालुक्यात जेवढी कामे सुरू आहेत तेवढी इतर ठिकाणी सुरू नाहीत.”

“मी नुसते सेल्फी काढत फिरत नाही. मी काम करणारा कार्यकर्ता आहे. येणाऱ्या काळात आम्ही एकत्र येऊ हे तुम्ही मनात आणू नका. तुम्हाला रोज फोन येतील. येत्या निवडणुकांमध्ये जर काही डाग लागला तर माझी राजकारणातील किंमत कमी होईल. नुसतं संसदेत भाषण करून विकास होत नाही. तुमची साथ आहे तोपर्यंत माझे काम वेगात सुरू राहील. काही लोकं भावनिक करण्याचा प्रयत्न करतील, पण भावनिक होऊन प्रश्न सुटत नाहीत, असे अप्रत्यक्षपणे त्यांनी शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यावर टीका केली.