पक्षात बंडखोरी करणाऱ्यांना शिवसैनिक कधीही माफ करणार नाही – विजय गुप्ता..

0
240

पिंपरी चिंचवड शहर शिवसेनेची उद्धवसाहेब आणि शिवसेनेवरील निष्ठा अढळ…

पिंपरी,दि. २५ (पीसीबी) :- शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेसाहेब यांच्या पडत्या काळात तमाम शिवसैनिक त्यांच्यावर अढळ निष्ठा ठेवून त्यांच्याच पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. पक्षात बंडखोरी करणाऱ्यांना शिवसैनिक कधीही माफ करणार नाही, असा निर्धारपूर्वक दावा शिवसेनेचे पिंपरी विधानसभा समन्वयक विजय गुप्ता यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केला आहे. याबरोबरच बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांना परत या म्हणून भावनिक आवाहनदेखील त्यांनी केले आहे.

पत्रकात गुप्ता यांनी म्हटले आहे, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी दादरच्या शिवतीर्थावर उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना तुमच्या पदरात घालतोय, त्यांना सांभाळा, असे भावनिक आवाहन केले होते. ज्या बाळासाहेबांनी रिक्षावाला, टपरीवाला, पेपरवाला, कारखान्यावर पावती फाडणारा, खाजगी गाडीवर ड्रायव्हर असणार्‍या या बंडखोरांना आमदार, खासदार ते थेट मंत्री केलं. शिवसेनेच्या जिवावर ज्यांनी ४-४ आमदारक्या मिरवल्या, करोडो रुपयांची माया जमवली त्यांनी चक्क शिवसेना पक्षावर आणि धनुष्य बाण चिन्हावरच दावा ठोकण्याचा प्रयत्न केलाय. बाळासाहेबांनी शिवसैनिकांच्या साथीने रक्ताचं पाणी करून वाढवलेला अख्खा पक्षच स्वतःच्या नावावर करण्याचा आणि मालक होण्याचा डाव आखला हे तळपायाची आग मस्तकात जाणारी बाब आहे. निष्ठावंतपणाचे ढोंग करणारी ही मंडळी आता बाळासाहेब ठाकरेंच्या नावानेच उद्धव ठाकरे यांच्याशी गद्दारी करण्याचे पाप करीत होत आहे.

पक्षात अनेक लोक येतात-जातात प्रत्येकाने विचार करूनच पुढचे पाऊल टाकावे. उद्या राजकारणात काहीही होवो पण या एका गोष्टीसाठी शिवसैनिक तुम्हाला कधीही माफ करणार नाही एवढं नक्की लक्षात ठेवा. भाजपाकडून वारंवार जाणीवपूर्वक त्रास दिला जात असतानाही उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री म्हणून देशात सर्वोत्कृष्ट काम केले आहे. त्यांनी सत्तेचा मोह कधीही ठेवला नाही. त्यांच्यावर पिंपरी चिंचवड शहर शिवसेनेची निष्ठा अढळ राहील, असे या पत्रकात गुप्ता यांनी म्हटले आहे.