चिखली, दि. २८ : ‘भाजपकडून राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाच्या माजी नगरसेवकांना बोलावून दम दिला जात आहे. व्यवसाय बंद पाडण्याची धमकी दिली जाते. त्यातून नगरसेवकांची फोडाफोडी केल्याचा’, आरोप उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला. ‘कोणाच्या दबावाला घाबरायचे नाही. दादागिरी, दमबाजीला बळी पडू नका, दहशत, दादागिरी नेस्तनाबूत करायची असल्याचे’ सांगून दोन्ही राष्ट्रवादीच्या आघाडीची घोषणाही त्यांनी केली.
पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांच्या प्रचाराचा शुभारंभ पवार यांच्या हस्ते रविवारी झाला. तळवडे येथे झालेल्या विजय संकल्प सभेत ते बोलत होते. विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, माजी आमदार विलास लांडे, शहराध्यक्ष योगेश बहल, अजित गव्हाणे यावेळी उपस्थित होते.
‘लोकांना बोलावून दम दिला जातो. त्यातून याला फोड-त्याला फोड असे केले जात आहे. पक्ष का सोडला असे विचारले असता बांधकामे चालू असून ती थांबवल्यावर कसे व्हायचे असून असे म्हणत प्रवेश केला असल्याचे माजी नगरसेवक सांगतात. मी २५ वर्षे असे कधी केले नाही. शहराची लोकसंख्या वाढत आहे. सन २०२९ ला पाच विधानसभा मतदारसंघ होतील. वाढत्या लोकसंख्येला पुरेसे पाणी मिळण्यासाठी पवना बंदिस्त जलवाहिनी प्रकल्प राबविण्याशिवाय पर्याय नाही. भामा-आसखेड धरणातील पाणीही पुरणार नाही. मुळशी धरणातील पाणी आणले जाणार आहे. हिंजवडी, चाकणमधील वाहतूक कोंडीची समस्या सोडविली जाणार आहे. येथील कमासासाठी जिल्हा नियोजन समितीमधून निधी दिला आहे. चाकण पर्यंत मेट्रो केली जाणार आहे. बाहेरील वाहने शहरात येऊ नयेत यासाठी रिंगरोड केला जात आहे’, असेही त्यांनी सांगितले.
‘आशिया खंडातील सर्वांत श्रीमंत अशी महापालिकेची ओळख होती. सन १९९२ पासून २०१७ पर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता होती. पण, महापालिकेला कधी कर्ज काढावे लागले नाही. माझ्यावर एक रुपयांचाही आरोप झाला नाही. आता महापालिकेत भ्रष्टाचार बोकाळला आहे. निविदेत रिंग केली जात आहे. ठराविक लोकांनाच निविदा भरायला सांगितले जाते. जनतेच्या पैशाचे अपव्यय केला जात आहे. भाजपच्या सत्ताकाळात महापालिका कर्जबाजारी झाली. महापालिकेला कर्जात ढकलनाऱ्यांना बाजूला करावे’, असे आवाहनही त्यांनी केले.
दोन्ही राष्ट्रवादीच्या आघाडीची घोषणा
‘पिंपरीत दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र निवडणूक लढविणार असून परिवार पुन्हा एकत्र येत आहेत. घड्याळ आणि तुतारी एकत्र येणार आहेत. जागांचे व्यवस्थित वाटप केले असून दोन दिवसांत सर्व समजेल. जेष्ठ नेते शरद पवार यांना विकासाचे व्हिजन असल्याने त्यांनी हिंजवडीत आयटी पार्क आणले, असे सांगत अजित पवार यांनी शरद पवार यांचे कौतुक केले.
भाजपच्या यादीनंतर राष्ट्रवादीची यादी
भाजपवाले मी कधी उमेदवार जाहीर करतो, याची वाट बघत आहेत. मी पण ते उमेदवार कधी जाहीर करताहेत हे पाहत आहे. त्यांची यादी जाहीर झाल्यानंतर मी उमेदवार यादी जाहीर करेल. कोणत्याही परिस्थितीत महापालिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ताब्यात आणायची आहे. कार्यकर्त्यांनी गाफील राहू नये, पायाला भिंगरी लावून प्रचार करावा. कोणावर खालच्या पातळीवर जाऊन टीका करू नये, असे आवाहनही त्यांनी केले.












































