छत्रपती संभाजीनगर, दि. २३ (पीसीबी) :- दिवाळीला अवकाश असून त्या आधीच राजकीय फटाके फुटू लागले आहेत. सर्वच पक्षातील नेते मोठ्या आतापासूनच राजकीय भूकंपाचे भाकीत वर्तवत आहेत. त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे. राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अजितदादा गटाचे १०-१५ आमदार आमच्या संपर्कात असल्याचा दावा केला होता. तर, अजितदादा गटाचे नेते धर्मराव बाबा अत्राम यांनी जयंत पाटील हेच आमच्या संपर्कात असून त्यांची वरिष्ठांशी बोलणी सुरू असल्याचे म्हणाले होते. राष्ट्रवादीचे हे दावे प्रतिदावे सुरू असतानाच आता शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांनी मोठे भाकीत करून खळबळ उडवून दिली आहे.
संजय शिरसाट यांनी राज्यात मोठा राजकीय भूकंप होण्याचे संकेतच दिले आहेत. ठाकरे गटातील लोकआमच्याकडे येऊ नये म्हणून आमच्या पक्षाबाबतच्या काहीही वावड्या उठवल्या जात आहेत. आमच्या पक्षाचा कोणताही खासदार आणि आमदार पक्षाच्या चिन्हा शिवाय कोणत्याही वेगळ्या चिन्हावर लढणार नाही. उलट त्यांच्या पक्षातून जे येणार आहेत ते लवकरच आमच्या पक्षात येतील. आमच्याच चिन्हावर लढतील. याची प्रचिती तुम्हाला येत्या १५ दिवसात येईलच, असे भाकीतच संजय शिरसाट यांनी केले आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली आहे.
उद्या मोठ्या जल्लोषात शिवसेनेचा मेळावा होणार आहे. बाळासाहेबांच्या विचाराशी बांधिल असलेल्या शिवसेनेचा संगम उद्या आझाद मैदानावर बघायला मिळणार आहे. टीका करणाऱ्यांनी शिवसेना लोकांच्या दरात उभी केली. राष्ट्रपती, पंतप्रधान हे सगळे मातोश्रीवर येऊन नतमस्तक होत होते. काही लोक खूर्चीच्या स्वार्थासाठी सिल्व्हर ओकच्या सोफ्यावर हात जोडून बसत आहेत. शिवसेना प्रमुख सांगायचे सत्ता माझ्यासाठी जन्माला आली पाहिजे. यांनी मात्र हा विचारच बाजूला सारला, अशी टीका संजय शिरसाट यांनी केली.
मराठा समाजाचा आंदोलन वेगळ्या पातळीवर आले आहे. आरक्षण मिळावे ही भावना योग्य आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी शब्द दिला. शिंदे साहेब हे दिलेला शब्द पाळतात. नेत्यांना गाव बंदी घालणे आंदोलनाचा भाग असला तरी यावर एकनाथ शिंदे लक्ष ठेऊन आहेत. मराठा समाजाला आरक्षण मिळेलच, यात काहीच शंका नाही, असेही ते म्हणाले.
छापून आलेल्या जाहिरातीतून प्रत्येक समाजासाठी सरकार काय करतं हे दाखवत आहे. मागच्या सरकारमध्ये हे काम होत नव्हते. शिंदे सरकार त्यात भरीव वाढ करून मदत करण्याचा प्रयत्न आहेत. वंचित घटकाला वर आणण्याचा प्रयत्न आहे. सरकार प्रत्येक समाजाच्या पाठीशी उभे आहे हे दाखवून देण्यासाठी जाहिरात देण्यात आली आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
संजय राऊत यांच्यासारख्या बकवास माणसाने बोलून उपयोग नाही. त्यांचं सरकार असताना त्यांनी अडीच वर्षात काय केलं ते त्यांनी सांगावं. आरक्षणाच्या विषयावर एकनाथ शिंदे हे पंतप्रधान मोदींकडे जातील आणि सर्व मंत्रिमंडळ देखील जाईल. सुप्रिया सुळे, शरद पवार, संजय राऊत वारंवार बोलतात. मात्र अडीच वर्षे सत्तेत असताना तुम्ही मराठा आरक्षणासाठी काय केले हे कधी सांगाल का? तुम्ही दिलेले आरक्षण कसे कमकुवत दिले? समाजाची सहानुभूती घेण्याच्या प्रयत्न करून नका. खऱ्या अर्थाने न्याय देण्याचा काम एकनाथ शिंदे करत आहेत.