पंतप्रधान मोदी यांची आज पुण्यात सभा

0
41

पुणे शहर, जिल्हा व सातारा जिल्ह्यातील महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज (मंगळवार) पुण्यातील स. प. महाविद्यालयाच्या मैदानावर सभा होत आहे. दरम्यान, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आणि शहरातील भाजप पदाधिकार्‍यांनी सभास्थळाची पाहणी करून माहिती घेतली.

पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर व पुणे येथे आज पंतप्रधान मोदी यांच्या दोन सभा होत आहेत. सोलापूर, सांगली, सातारा व कोल्हापूर जिल्ह्यांतील महायुतीच्या उमेदवारांसाठी सोलापूर येथे दुपारी, तर पुणे आणि सातारा जिल्ह्यांतील उमेदवारांसाठी सायंकाळी सहाच्या वाजता पुण्यातील स. प. महाविद्यालयाच्या मैदानावर सभा होत आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

या सभेसाठी केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले व उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित राहणार आहेत.सभेसाठी महायुतीच्या वतीने जोरदार तयारी करण्यात आली आहे. सभास्थळी चाळीस हजार खुर्च्यांसह व्हीव्हीआयपींची स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे.

केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, भाजप प्रदेश महामंत्री राजेश पांडे, शहराध्यक्ष धीरज घाटे, प्रवक्ते संदीप खर्डेकर, श्रीनाथ भिमाले, अजय खेडकर, शिवसेना नेते किरण साळी यांनी सोमवारी सायंकाळी सभास्थळी भेट देऊन तयारीचा आढावा घेतला आणि आवश्यक त्या सूचना केल्या.

असा आहे पंतप्रधानांचा आजचा संभाव्य दौरा

सभेचे ठिकाण : स. प. महाविद्यालय मैदान

सायंकाळी 6 वाजून 10 मिनिटांनी लोहगाव विमानतळावर आगमन

सायंकाळी 6 वाजून 30 मिनिटांनी सभास्थळी पंतप्रधान नरेंद्र मोदी येणार

सभा संपल्यानंतर 7 वाजून 15 मिनिटांनी विमानतळाकडे प्रस्थान करण्याची शक्यता

साधारणत: 45 मिनिटे पंतप्रधान सभास्थळी थांबणार आहेत