नवी दिल्ली, दि. २४ – राज्यात विधानसभा निवडणुकांची घोषणा होताच महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. येत्या 20 नोव्हेंबरला एकाच टप्प्यात महाराष्ट्रातील 288 मतदारसंघांसाठी मतदान पार पडणार आहे. तर २३ नोव्हेंबरला विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर होणार आहे. आगामी विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजताच राज्यातील सर्वच पक्ष जोमाने कामाला लागले आहेत. एकीकडे विविध पक्षांकडून उमेदवारी यादी जाहीर होत आहेत. तर दुसरीकडे उमेदवारांचा प्रचार कसा करायचा, याचे वेळापत्रक ठरवले जात आहे. त्यातच आता महायुतीच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महाराष्ट्रात येणार आहेत.
राज्यातील विधानसभा निवडणुका तोंडावर येऊन ठेपल्या आहेत. निवडणुका जाहीर होताच अनेक पक्षांनी प्रचारसभांचे नियोजन करण्यास सुरुवात केली आहे. महाराष्ट्रातील २८८ मतदारसंघांमध्ये कुठे, कोणत्या ठिकाणी, कोणत्या वेळेत प्रचार सभा घ्यायच्या याचे नियोजन सुरु करण्यात आले आहे. विधानसभा निवडणुकांच्या प्रचारतोफा १८ नोव्हेंबर २०२४ रोजी थंडावणार आहेत. त्यामुळे येत्या काही दिवसात महाराष्ट्रात ठिकठिकाणी प्रचार सभांचा धडका पाहायला मिळणार आहे. त्यातच आता पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महायुतीतील उमेदवारांच्या प्रचारासाठी महाराष्ट्रात 8 दिवस जाहीर सभा घेणार आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महाराष्ट्रात 8 दिवस सभा होणार आहेत. येत्या 7 नोव्हेंबर ते 14 नोव्हेंबर दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महाराष्ट्रात असणार आहे. या काळात ते महाराष्ट्रातील विविध मतदारसंघात सभा घेतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विभागवार सभा घेणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या सभा फक्त भाजपच नाही तर महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी घेतल्या जाणार आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे १४ नोव्हेंबरपासून विदेश दौऱ्यावर आहेत. त्यामुळे पंतप्रधान मोदींना महाराष्ट्रात सभा घेण्यासाठी कमी कालावधी मिळणार आहे. मात्र या कालावधीतही जास्तीत जास्त सभा कशा घेतल्या जातील, याकडे महायुतीचा कल असणार आहे.
महायुतीकडून १८२ उमेदवारांची यादी जाहीर
दरम्यान यंदाच्या विधानसभा निवडणुकीत महायुती विरुद्ध महाविकासआघाडी अशीच थेट लढत पाहायला मिळणार आहे. त्यासोबतच परिवर्तन महाशक्ती तिसरी आघाडी, वंचित बहुजन आघाडी आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनाही स्वबळावर निवडणुका लढवताना दिसणार आहे. महायुतीकडून आत्तापर्यंत १८२ उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. त्यात भाजपकडून ९९, शिवसेना शिंदे गटाने ४५ आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस गटाने ३८ उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत.