पंतप्रधान नरेंद्र मोदी १८ एप्रिल रोजी चिंचवडला

0
11

– क्रांतिकारी चाफेकर बंधूंच्या स्मारकाचे होणार लोकार्पण
चिंचवड, दि. ३ : पिंपरी चिंचवड शहराची खरी ओळख असलेल्या क्रांतिकारी चाफेकर बंधूंच्या ऐतिहासिक स्मारकाचे आणि चाफेकर वाड्याचे लोकार्पण १८ एप्रिल रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे.
पुणे जिल्ह्यातील चिंचवड येथे येणार असून, क्रांतिकारी चाफेकर बंधूंच्या ऐतिहासिक स्मारकाचे आणि चाफेकर वाड्याचे लोकार्पण त्यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. मागच्या टर्ममध्ये मुख्यमंत्री असतांना देवेंद्र फडणवीस यांनी स्मारकाचे भूमीपुजन केले होते आणि उद्घाटन नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात येईल असे सांगितले होते. त्यानुसार आता या सोहळ्याचे भव्य स्वरूपात आयोजन करण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे.

चिंचवडमधील चाफेकर वाडा हा भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासातील एक महत्त्वाचा वारसा आहे. चापेकर बंधूंनी इंग्रज सत्तेच्या विरोधात लढा देत आपल्या बलिदानाने स्वातंत्र्याच्या लढ्याला प्रेरणा दिली होती. या पार्श्वभूमीवर, या स्मारकाचे निर्माण आणि त्याचे उद्घाटन हा ऐतिहासिक क्षण ठरणार आहे. देशभरातील क्रांतिवीरांच्या गाथा आणि चित्रांचा मोठा संग्रह स्मारकात पहायला मिळणार आहे.

या लोकार्पण सोहळ्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस , उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे , अजित पवार यांच्यासह अनेक केंद्रीय मंत्री, स्थानिक खासदार, आमदार आणि इतिहासप्रेमी उपस्थित राहणार आहेत. पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून या कार्यक्रमासाठी जोरदार तयारी सुरू असून, सुरक्षा व्यवस्थाही तितक्याच काटेकोरपणे राबवली जात आहे. महापालिका आयुक्त शेखर सिंह यांच्या उपस्थितीत शहरातील सर्व आमदार, स्मारक समितीचे पदाधिकारी यांच्या उपस्थितीत पहिलीच बैठक आज महापालिकेत पार पडली.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या या दौऱ्यामुळे महाराष्ट्राच्या ऐतिहासिक वारशाला नवसंजीवनी मिळणार असून, चापेकर बंधूंचे स्मारक ही देशभक्ती आणि त्यागाची साक्ष देणारी ऐतिहासिक वास्तू म्हणून भविष्यात ओळखली जाईल.