पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवाला धोका असून त्यांना वाचवा

0
9

पिंपरी चिंचवड पोलिसांना आलेल्या फोनमुळे पोलीस दलात खळबळ

चिंचवड, दि. २६ (पीसीबी) : एका अभियंत्याने पिंपरी चिंचवड पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला फोन केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवाला धोका असून त्यांना वाचवा, असे त्या व्यक्तीने सांगितले. या फोनमुळे राज्य पोलीस दलात एकच खळबळ उडाली. त्यानंतर पिंपरी चिंचवड पोलिसांनी काही कालावधीतच संबंधित तरुणाला ताब्यात घेतले. सध्या तरुणाकडे चौकशी करण्याचे काम सुरू आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा गुरुवारी (दि. 26) पुणे दौरा नियोजित होता. मेट्रोसह एकूण 12 प्रकल्पांचे 22 हजार 600 कोटींच्या कामाचे लोकार्पण व भूमिपूजन त्यांच्या हस्ते होणार होते. मात्र, पुणे शहर परिसरात सुरू असलेल्या पावसामुळे मोदी यांचा आजचा दौरा रद्द करण्यात आला.

गुरुवारी सकाळी एका अभियंता तरुणाने “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वाचवा…, त्यांना मदत करा”, असा कॉल आपत्कालीन नियंत्रण कक्षाला केला. या कॉल नंतर राज्य पोलीस दलात एकच खळबळ उडाली. तांत्रिक तपासाद्वारे हा तरुण पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील थेरगाव परिसरात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार, काही मिनिटातच वाकड पोलिसांनी बस थांब्यावर बसची वाट पाहत असलेल्या तरुणाला ताब्यात घेतले. तरुण मूळचा उदगीर येथील असून तो थेरगाव येथे त्याच्या मित्राकडे आला होता.

अभियंता तरुणाने असा कॉल का केला. तसेच, त्याच्याकडे नेमकी काय माहिती आहे, याची कसून चौकशी सुरू आहे. पोलिसांसह राज्य दहशतवाद विरोधी पथकाने देखील या कॉलची गंभीर दखल घेतली असून त्यांच्याकडून देखील समांतर चौकशी सुरू आहे.