पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली तिरुपती बालाजीची पूजा

0
180

१४० कोटी भारतीयांच्या आरोग्यासाठी, कल्याणासाठी आणि समृद्धीसाठी प्रार्थना

तिरुमला, दि. २७ (पीसीबी) – तेलंगणमध्ये रविवारी विविध प्रचारसभा घेतल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज सकाळी तिरुमलामध्ये व्यंकटेश्वर मंदिरात आले तिथे त्यांनी बालाजीचं दर्शन घेतलं. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या मंदिरात बालाजीची विधीवत पूजा केली. तिरुमला व्यंकटेश्वर स्वामी मंदिरात जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १४० कोटी भारतीयांच्या आरोग्यासाठी, कल्याणासाठी आणि समृद्धीसाठी प्रार्थना केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पारंपरीक वेश परिधान केला होता.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे रविवारी संध्याकाळी तिरुपती बालाजी मंदिराजवळ असलेल्या रेनिगुंटा विमानतळावर उतरले. आंध्र प्रदेशचे राज्यपाल एस. अब्दुल नजीर आणि मुख्यमंत्री वाय एस आर जगन मोहन रेड्डी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचं स्वागत केलं.

सकाळी झालेल्या पूजेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दुपारी १२.४५ च्या दरम्यान महबुबाबाद या ठिकाणी जाणार आहेत. त्यानंतर तेलंगणच्या करीम नगर या ठिकाणी त्यांची सभा पार पडणार आहे. ही सभा दुपारी २.४५ होणं अपेक्षित आहे. त्यानंतर संध्याकाळी ५ वाजण्याच्या दरम्यान हैदराबादमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रोड शो होणार आहे. त्यानंतर त्यांच्या दिवसभराच्या कार्यक्रमाचा समारोप होईल.

तेलंगणमध्ये ३० नोव्हेंबरला मतदान
तेलंगणमध्ये ३० नोव्हेंबरला मतदान होणार आहे. रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तेलंगण येथील निर्मल या जिल्ह्यात निवडणूक रॅली घेतली. त्यावेळी भाषण करताना नरेंद्र मोदी यांनी सत्ताधारी पक्षावर तिखट शब्दांत टीका केली. के. चंद्रशेखर राव हे गरीबांचे शत्रू आहेत असंही वक्तव्य त्यांनी केलं. या प्रचाराच्या धामधुमीत आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिरुपती बालाजीचं दर्शन घेतलं आणि १४० कोटी भारतीयांसाठी आशीर्वाद मागितले.