पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे जगताप यांच्या कुटुंबियांना सांत्वनपर पत्र

0
392

पिंपरी, दि.१४ (पीसीबी) – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या कुटुंबियांचे पत्राद्वारे सांत्वन केले आहे. चिंचवड मतदारसंघाचे तीनवेळा नेतृत्व केलेले आणि एकदा विधान परिषदेवर निवडून आलेले आमदार लक्ष्मण जगताप यांचे 3 जानेवारी रोजी निधन झाले. त्याबाबतचे वृत्त समजल्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी जगताप कुटुंबियांना पत्र पाठवून आमदार लक्ष्मण जगताप यांच्याविषयीच्या भावना व्यक्त केल्या आहेत.

लक्ष्मण जगताप यांच्या निधनाची बातमी समजल्यानंतर अतीव दुःख झाले. या कठीण काळात माझ्या संवेदना जगताप कुटुंबियांसोबत आहेत. सहज आणि सरळ व्यक्तिमत्त्वाचे लक्ष्मणभाऊ जमीनीसोबत जोडलेले नेते होते. ते लोककल्याणासाठी सदैव समर्पित राहिले. पुणे आणि आसपासच्या परिसराच्या विकासात त्यांनी उल्लेखनीय योगदान दिले आहे. समाजासाठी केलेल्या निःस्वार्थ सेवेसाठी लोक त्यांना नेहमीच स्मरणात ठेवतील. त्यांच्या निधनाने भाजपा आणि समाजाची कधीही भरून न येणारी हानी झाली आहे.

लक्ष्मणभाऊ आपल्या परिवारासाठी मजबूत आधार आणि प्रेरणास्त्रोत होते. ते आज या जगात नसले तरी त्यांच्या आठवणी आणि त्यांची जीवनमूल्ये जगताप कुटुंबासोबत कायम राहतील, असे मोदी यांनी पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे.