पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवसाचे औचित्य साधून भाजपच्यावतीने आजपासून सेवा पंधरवडा

0
236

नागपूर, दि. १७ (पीसीबी) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवसाचे औचित्य साधून भाजपच्यावतीने सेवा पंधरवडा साजरा केला जाणार आहे. त्या निमित्ताने आजपासून म्हणजे १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबरदरम्यान रक्तदान, आरोग्य तपासणी शिबिर, स्वच्छता मोहीम, व्याख्याने असे विविध उपक्रम राबविले जाणार असल्याचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले. आरोग्यविषयक उपक्रमांमध्ये स्वच्छता, रक्तदान, विनामूल्य आरोग्य तपासणी, दिव्यांगांना कृत्रिम अवयव व उपकरणे देणे, टीबी झालेल्यांना मदत करणे आणि कोरोना लसीकरणाचा बूस्टर डोस घेण्यास नागरिकांना मदत करणे यांचा समावेश आहे.

पर्यावरणाच्या रक्षणाची जाणीव होण्यासाठी वृक्षारोपण कार्यक्रम आणि जलाशयांचे स्वच्छता अभियान राबविण्यात येईल. कार्यकर्ते घरोघरी जाऊन जल संरक्षणाचा संदेश पोहोचवतील. पंतप्रधानांच्या जनकल्याणकारी धोरणांची व कार्यक्रमांची होर्डिंग व बॅनर लावण्यात येतील. तसेच याविषयी सोशल मीडियावरून जनजागृती अभियान राबविण्यात येईल.

देशात एकात्मतेची भावना दृढ होण्यासाठी भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी एक दिवस अन्य राज्याप्रमाणे आहार, भाषा अशा सांस्कृतिक वारशाचा अनुभव घेण्याचा अनोखा उपक्रम या पंधरवड्यात घेण्यात येईल. तसेच स्थानिक उत्पादनांची खरेदी आणि व्यवसायांना चालना मिळण्यासाठी भाजप कार्यकर्ते पुढाकार घेतील असे बावनकुळे यांनी सांगितले.

पंधरवड्यासाठी जिल्हाध्यक्ष अरविंद गजभिये जबाबदाऱ्यांचे वाटप केले आहे. सेवा पंधरवाडा अभियानाचे जिल्हा संयोजक म्हणून संघटन महामंत्री किशोर रेवतकर यांचेवर जबाबदारी देण्यात आली आहे. १७ सप्टेंबर रोजी कळमेश्वर येथे नरेन्द्र मोदी यांच्या जीवनावर प्रदर्शन आयोजीत करण्यात येणार असून यासाठी जिल्हा महामंत्री इमेश्वरराव यावलकर, जिल्हा उपाध्यक्ष मिना तायवाडे व सरदार लकीसिंग चावला यांना जबाबदारी देण्यात आली आहे. नरेन्द्र मोदी यांच्या जनकल्याणकारी योजना व प्रशासकीय कार्यकौशल्या विषयी पुस्तक प्रदर्शनी आयोजीत करणे, स्टॉल लावणे या कार्यक्रमासाठी ॲड. प्रकाश टेकाडे व नरेश मोटघरे यांना जबाबदारी देण्यात आली आहे. वानाडोंगरी येथे जिल्हास्तरीय रक्तदान शिबिर आयोजीत करण्यात येणार असून जिल्हा स्तरावर किमान १००० युनिट रक्त गोळा करण्याचे उद्दिष्ट निर्धारीत करण्यात आले आहे. आदर्श नंदलाल पटले व राहुल चंद्रभानजी किरपान यांना जबाबदारी देण्यात आली आहे.

१८ सप्टेंबर ते २ ऑक्टोबरपर्यंत भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. २ ऑक्टोबर राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती साजरी करण्यात येणार आहे जिल्ह्यातील सर्व २३७७ बूथवर राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करणे, मंडलात एका ठिकाणी राष्ट्रपिता महात्मा गांधी जीवनावर चर्चासत्राचे आयोजन करणे, यासाठी जिल्हा महामंत्री अजय रघुनाथराव बोढारे यांना जबाबदारी देण्यात आली आहे, असे जिल्हाध्यक्ष अरविंद गजभिये यांनी सांगितले.