पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या टीममधील अधिकारी डॉ. श्रीकर परदेशी आता फडणवीस यांचे सेक्रेटरी

0
193

पिंपरी, दि.१३ (पीसीबी) : कर्तव्यकठोर, शिस्तबध्द, अत्यंत प्रामाणिक आणि तेवढेच कार्यक्षम सनदी अधिकारी म्हणून ओळखले जाणारे डॉ. श्रीकर परदेशी यांची नियुक्ती नवे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सचिव म्हणून आज (ता.१२) करण्यात आली. परदेशातील एक वर्षाच्या प्रशिक्षणाहून परतताच त्यांची बदली थेट उपमुख्यमंत्री कार्यालयात करण्यात आली. अनधिकृत बांधकामाचे कर्दनकाळ म्हणून त्यांची पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्तपदाची कारकिर्द खूप गाजली. त्यांच्या येथील पावणे दोन वर्षाच्या कारकिर्दीत अनधिकृत बांधकामांना पूर्ण आळा बसला होता. भ्रष्ट अधिकारी, कर्मचाऱ्यांचे धाबे दणानले होते. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अत्यंत निकटवर्ती अधिकाऱ्यांत त्यांची गणना केली जाते. मोदी-शहा यांच्या आदेशानुसार त्यांच्याकडे फडणवीस यांच्या सचिवपदाची जबाबदारी सुपूर्द करण्यात आली आहे, असे समजले, 

 

 डॉ. परदेशी हे पिंपरी-चिंचवडपासून महाराष्ट्रात विशेष ओळखले जाऊ लागले. पिंपरी चिंचवड शहररात नदीच्या पूररेषेत होणाऱ्या बहुमजली इमारतींवर त्यांनी कारवाई केली. आमदार, खासदार, बिल्डर यांच्या दबावापुढे न झुकता त्यांनी अवैध बांधकामांवरची कारवाई कायम ठेवल्याने करदात्या जनतेने त्यांचे कौतुक केले. अचानक त्यांची बदली झाली त्यावेळी शहरातील बहुसंख्य संस्था, संघटनांनी लढा पुकारला होता.

नंतर राज्याचे नोंदणी महानिरीक्षक असतानाही त्यांनी या विभागाचा महसूल वाढविला आणि भ्रष्टाचाराला आळा घालण्याचे मोठे काम केले होते.

त्यांची ही सचोटी व कार्यक्षमता पाहूनच त्यांना २०१५ मध्ये पंतप्रधान कार्यालयाने (पीएमओ) आपल्याकडे उपसचिव म्हणून प्रतिनियुक्तीवर घेतले. तेथेही त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटवीत पदोन्नती घेतली. जून २०२१ ला ते पुन्हा महाराष्ट्रात परतले. त्यांची नियुक्ती `सिकॉम`चे व्यवस्थापकीय संचालक म्हणून करण्यात आली. तेथूनच ते वर्षभराच्या प्रशिक्षणासाठी परदेशात गेले होते. तेथून परतताच त्यांची थेट उपमुख्यमंत्र्यांचे सचिव म्हणून बदलीवर आज नियुक्ती झाली. 

डॉ. परदेशी हे खासगी कामासाठी सरकारी मोटारीचा कटाक्षाने वापर करणे टाळत होते. रजेवर असताना ते गावी आरामबसने जात असत. हेडमास्टर अशीच त्यांची प्रतिमा पालिकेत होती. गणवेष आवश्यक असलेल्या कर्मचाऱ्यांना त्यांनी तो सक्तीचा केला होता. अत्यंत शिस्तप्रिय अधिकारी असा त्यांचा दरारा होता. त्यांच्या कालावधीत पालिका कारभारच नाही, तर वाकड्यातील काही अधिकारी व कर्मचारी सुद्धा सुतासारखे सरळ झाले होते. पिंपरीतील महापालिका मुख्यालयात आयुक्त कार्यालय हे चौथ्या मजल्यावर आहे. फिटेनेसविषयी खूप जागरूक असलेले डॉ. परदेशी हे कार्यालयात येताना वा जाताना कधीही लिफ्टचा वापर करीत नव्हते.

 

२००१ च्या आयएएस बॅचचे अधिकारी असलेल्या डॉ. परदेशींनी जेथे नियुक्ती होईल तेथे आपल्या कामाचा ठसा उमटवलेला आहे. नांदेडचे जिल्हाधिकारी म्हणूनही त्यांनी कारकिर्द गाजली होती. यवतमाळ, कोल्हापूर, अकोला इथेही त्यांनी असेच काम केले. सर्वोत्कृष्ट जिल्हाधिकारी म्हणूनही त्यांना गौरविण्यात आलेले आहे. जलसंधारणावर त्यांचा दांडगा अभ्यास आहे.