– आता तळेगाव दाभाडेत पवार यांनी केलेल्या भूमीपूजन स्थळावर गोमूत्र शिंपडणाऱे भाजपावाले काय बोलणार
पिंपरी, दि. १४ (पीसीबी) – खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या खांद्यावर हात ठेवल्याने आता समाजमाध्यमांवर चर्चा रंगली आहे. अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांचे सख्य सर्वश्रृत असून दोनच दिवसांपूर्वी माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दादा तुम्हा भाजपामध्ये या असे म्हणत पहाटेच्या त्या शपथविधीची आठवण करुन दिली आहे. दरम्यान, दहा दिवसांपूर्वी अजित पवार यांच्या हस्ते तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या नूतन इमारतीचा भूमिपूजन समारंभ पवार यांच्या हस्ते पार पडला आणि नंतर लगेचच पवार यांच्यामुळे परिसर अपवित्र झाल्याचा कांगावा करत जिल्हा भाजपाने गोमूत्र शिंपडले होते. मोदी यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या खांद्यावर हात ठेवल्याने आता मावळ तालुका भाजपाची भूमिका काय राहणार याकडे लक्ष लागून राहिले आहे.
राजशिष्टाचाराचा भाग म्हणून राज्याच्या वतीने मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे मोदी यांच्या स्वागताची जबाबदारी होती. ठाकरे उपस्थित राहणार नसल्याने ते काम अजित पवार यांच्याकडे आले. पुणे विमानतळावर मोदींनी पाय ठेवताच अजितदादांनी त्यांचे स्वागत केले, हात जोडून नमस्कार केला. त्याचक्षणी मोदी यांनी पवार यांच्या खांद्यावर हात ठेवत विचारपूस केली. मोदी यांनी त्यावेळी ज्या आस्थेने विचारपूस केली तोच आता सोशल मीडियात आणि संपूर्ण राजकिय वर्तुळात मोठा चर्चेचा विषय आहे.
अजित पवार यांचे भाजपा नेत्यांशी सलोख्याचे संबंध आहेत. अडिच वर्षांपूर्वी पहाटेच्या वेळी फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ राजभवनावर घेतली आणि धमाल उडवून दिली होती. तेव्हापासून दादा आणि फडणवीस यांच्यातील मधूर संबंधाने गूढ निर्माण केले ते आजही कायम आहे. सहा महिन्यांपूर्वी अंमलबजावणी संचालनालयाचे (ईडी) छापे अजित पवार आणि त्यांच्या दोन बहिणींच्या कंपन्यांवर पडले होते. पवार यांची सुमारे हजार कोटींची मालमत्ता ईडी ने जप्त केली होती. तेव्हापासून आजपर्यंत अजित पवार यांनी भाजपा विरोधात एक शब्दसुध्दा काढला नाही.
राज्यसभेसाठी चुरस निर्माण झाली आणि महाआघाडी बरोबरच्या सहा अपक्षांचे मतदान भाजपा उमेदवार धनंजय महाडिक यांना झाले. ते सर्व अपक्ष अजित पवार यांचे समर्थक असल्याचे आता समोर आले आहे. २० जून रोजी होणाऱ्या विधान परिषदेसाठी भाजपाने पाचही उमेदवार विजयी करण्याचा संकल्प केला आहे. देवेंद्र फडणवीस हे आत्मविश्वासाने ग्वाही देत आहेत. त्यामुळेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पवार यांच्या खांद्यावर हात ठेवण्याचे अनेक अर्थ काढले जातात. पंतप्रधान मोदी यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या खांद्यावर ठेवलेले छायाचित्र समाज माध्यमात चर्चेचा विषय ठरले. हे छायाचित्र मोठ्याप्रमाणात व्हायरला झाले. यावरून राजकीय चर्चाही सुरू झाली.अजितदादांच्या खांद्यावरील पंतप्रधान मोदींचा हात असाच कायम राहिला तर नजीकच्या काळात राज्यातील राजकीय चित्र बदलू शकते हा या चर्चेचा सूर होता. अजित पवार यांच्या खांद्यावर पंतप्रधान मोदी यांचा हात असाच राहिला तर राज्यातील सत्तेची समकिरणे पुन्हा बदलू शकतात, असा या साऱ्या चर्चेचा सूर होता.
गोमूत्र शिंपडणाऱ्या तळेगाव भाजपाची कोंडी –
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तळेगाव नगरपालिकेच्या नूतन इमारतीचे भूमीपूजन केले. त्यानंतर भाजपाने पवना जलवाहिनीत तीन शेतकऱ्यांच्या मृत्यूला पवार जबाबदार असल्याने त्यांच्या हस्ते केलेले भूमीपूजनाने परिसर अपवित्र झाल्याचे सांगत गोमूत्र शिंपडले होते. माजी मंत्री बाळा भेगडे आणि भाजपाचे जिल्हाअध्यक्ष गणेश भेगडे यांच्याच नेतृत्वाखाली तो कार्यक्रम झाला होता. भाजपाच्या त्या कृत्याला राष्ट्रवादीचे आमदार सुनिल शेळके समर्थकांनी तत्काळ चोख उत्तर दिले. सहा महिन्यापूर्वी नगरपालिकेच्या व्यापार संकुलाचे उद्घाटन पवार यांच्याच हस्ते करण्यात आले होते. त्याशिवाय तालुक्यात वडगाव मावळ येथील अद्यावत शासकिय संकुलाचे भूमीपूजनसुध्दा पवार यांनीच केले होते. त्यावेळी भाजपा नेते माजी मंत्री बाळा भेगडे पवार यांच्या मांडिला मांडी लावून बसले होते, असे फोटो राष्ट्रवादीने व्हायरल केले आणि भाजपाला जाब विचारला. आता खुद्द मोदी यांनी पवार यांच्या खांद्यावर हात ठेवला म्हणून राष्ट्रवादीचे कार्यकर्ते भाजपाकडे विचारणा करत आहेत. भाजपाची या घडामोडीत मोठी कोडी झाली आहे.