पंतप्रधान नरेंद्र मोदी निवृ्त्ती घेणार ?

0
21

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे पुढचे वारसदार महाराष्ट्रातून असेल आणि तो संघ ठरवेल, असं मोठं विधान शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलं आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळं केंद्रासह राज्याच्या राजकीय गोटात चांगलीच खळबळ माजली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी निवृ्त्ती घेणार असल्याची चर्चा जोरदार रंगली आहे. त्यामुळं भाजपच्या नियमानुसार सप्टेंबरमध्ये निवृत्ती घेणार का? मोदींचा उत्तराधिकारी महाराष्ट्र राज्याचाच असेल की आणखी कोणी? याबाबत भाजपचे नियम काय आहेत? असं अनेक सवाल उपस्थित होत आहेत.

मोदींच्या निवृत्तीवर भाष्य करताना आरएसएसच्या सुत्रानी चर्चां फटकारले आहे. मोदींच्या निवृत्तीच्या चर्चा या खोट्या असून याबाब अद्याप कोणताही विचार नसल्याचे म्हटलं आहे. पंतप्रधान मोदी त्यांचा तिसरा कार्यकाळही पूर्ण करतील. जर त्यांची तब्येत चांगली राहिली तर ते राजकारणात नेतृत्व करत राहतील. पण पंतप्रधान मोदींनंतर कोण? याचा शोध सुरु आहे.

दुसऱ्या फळीच्या शर्यतीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावांची चर्चा आहे. पंतप्रधान मोदी यांनी २६ मे २०१४ रोजी पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारली. त्यांनी यापूर्वी जुलै २०१३ मध्ये संघ मुख्यालयाला भेट दिली होती. त्यानंतर त्यांनी दुसऱ्यांदा रविवारी भेट दिल्यामुळं राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे.

भाजपाचे नेते राजकीय निवृत्ती कधी घेतात?

भाजपामधील नेते ७५ वर्षांचे झाल्यानंतर ते स्वेच्छेने राजकारणातून निवृत्त होतात, असं सांगितले जातं. वयाची ७५ वर्ष पूर्ण झाल्यावर राजकारणातून दूर व्हावे आणि नव्या पिढीला संधी द्यावी असे फर्मान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच काही वर्षांपूर्वी काढले होते.

पंतप्रधान मोदी हे आता ७४ वर्षांचे आहेत. १७ सप्टेंबर २०२५ रोजी ते ७५ वर्षांचे होतील. तर २०२९ पर्यंत ते ७८ वर्षांचे होणार आहेत. पंतप्रधान मोदी या वर्षी निवृत्त होतील की, नाही याबद्दल सध्या अधिकृतपणे काहीही सांगण्यात आलेले नाही. त्यामुळे भाजपा २०२९ च्या लोकसभा निवडणुकीसाठी पंतप्रधानपदाचा नवा चेहरा शोधणार का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

राऊतांच्या दाव्यावर मुख्यमंत्री फडणवीस काय म्हणाले?

मोदीजींचं उत्तराधिकारी शोधण्याचं कोणतंही कारण नाही. ते अजून बरेच वर्ष काम करणार आहेत. आमचा सगळ्यांचा आग्रह आहे की 2029चे पंतप्रधान म्हणून मोदीजींकडे बघतो आहोत. त्यामुळे आता अशी चर्चा करणे योग्य होणार नाही.

असं सागंत फडणवीस पुढे म्हणाले, भारतीय संस्कृतीत वडील जिवंत असताना मुलांचा विचार होत नाही. ही सगळी मोगली संस्कृती आहे. वडील जिवंत असताना मुलं असा विचार करतात. त्यामुळे आता कोणाचाही उत्तराधिकारी निवडण्याची वेळ आली नाही. जोपर्यंत माझा विषय आहे माझा त्याच्याशी संबंध नाही. असही यावेळी फडणवीस यांनी यावेळी स्पष्ट केलं.

तो निर्णय आरएसएस घेईल…संघाची मोठी प्रतिक्रिया

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सरकार्यवाहक भय्याजी जोशी यांना मोदींचा उत्तराधिकारी कोण असेल असा सवाल उपस्थित केला असता, “उत्तराधिकाऱ्याचा सध्या प्रश्नच कुठे आहे. संघात जी परंपरा आहे, त्यानुसार होईल. तो निर्णय आरएसएस घेईल”, असं भय्याजी जोशी यांनी म्हटलं आहे. तसेच, फडणवीसांच्या नावाच्या चर्चेसंदर्भात विचारले असता, याबद्दल मला काही कल्पना नाही, असं जोशी यांनी स्पष्ट केलं.

राऊत नेमकं काय म्हणाले होते?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी नागपूरच्या रेशीमबागमधील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्मृती मंदिराला भेट दिली होती. संजय राऊत यांनी नरेंद्र मोदी यांच्या राजकीय वारसादाराबद्दल भाष्य केले आहे.

नरेंद्र मोदी यांचा वारसदार कोण असेल? असा प्रश्न राऊतांना माध्यमांकडून विचारण्यात आला होता. यावर संजय राऊतांनी तो नेता बहुतेक महाराष्ट्रातील असेल असे म्हटले आहे. इतकेच नाही तर हा नेता राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ठरवेल असेही राऊत म्हणाले आहेत.