पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत डुडुळगावात 1190 घरे बांधणार, 143 कोटींचा खर्च

0
269

पिंपरी, दि. 4(पीसीबी) – पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत महापालिकेच्यावतीने डुडुळगाव येथे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी (ईडब्ल्युएस) 1190 घरे बांधण्यात येणार आहेत. त्यासाठी महापालिकेमार्फत निविदा मागविण्यात आल्या आहेत. या प्रकल्पासाठी 142 कोटी 89 लाख रूपये बांधकाम खर्च अपेक्षित धरण्यात आला आहे.  

केंद्र सरकारमार्फत ‘सर्वांसाठी घरे – 2022’ या संकल्पनेवर आधारीत पंतप्रधान आवास योजना हे अभियान राबविण्यात येत आहे. या योजनेची राज्यात अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने गृहनिर्माण विभागाने 9 डिसेंबर 2015 रोजी पंतप्रधान आवास योजनेसाठी राज्यातील 51 शहरांची निवड केली. त्यानुसार, या योजनेत पिंपरी – चिंचवड महापालिकाही सहभागी झाली आहे. राज्य सरकारने 22 मार्च 2017  रोजीच्या पत्रान्वये पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत पुढील 5 वर्षात घरे बांधण्याबाबत महापालिकेस लक्ष्यांक दिले आहे. त्याबाबत नियोजन करुन तात्काळ प्रस्ताव ‘म्हाडा’स सादर करण्याविषयी कळविले आहे.

डुडुळगाव येथील आरक्षित जागेवर पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी (ईडब्ल्युएस) 1190 घरे बांधण्यासाठीच्या सविस्तर प्रकल्प अहवालाला (डीपीआर) केंद्र सरकारच्या केंद्रीय मान्यता व सनिंयत्रण समितीने 30 मार्च 2022 रोजीच्या 60 व्या बैठकीत मान्यता दिली आहे. या प्रकल्पाच्या कामासाठी सन 2021-22 च्या सार्वजनिक बांधकाम दरसूची नुसार, अंदाजे 173 कोटी 64 लाख रूपये इतका खर्च अपेक्षित आहे. त्यामध्ये स्थापत्य विषयक कामासाठी 131 कोटी 66 लाख रूपये, विद्युत विषयक कामांसाठी 10 कोटी 94 लाख रूपये, मटेरियल टेस्टींगसाठी 31 लाख रूपये असा अंदाजित 142 कोटी 89 लाख रूपये खर्च धरण्यात आला आहे.

तर, रॉयल्टी, कामगार विमा, जीएसटी, आकस्मिक तसेच आस्थापना असा इतर खर्च धरून 173 कोटी 64 लाख रूपये खर्च अपेक्षित धरण्यात आला आहे. या कामाला 20 जून 2017  रोजी महापालिका सभेची मान्यता मिळाली आहे. महापालिकेच्या सन 2022-23 च्या वार्षिक अर्थसंकल्पात या कामासाठी दोन कोटी रूपये तरतुद उपलब्ध आहे. या ठरावाच्या अंमलजावणीस महापालिका आयुक्तांनी 23 मे 2022 रोजी मान्यता दिली आहे.

पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत घरे बांधण्याच्या प्रकल्पात केंद्र, राज्य सरकार आणि लाभार्थी यांचा हिस्सा असून महापालिकेचा रोख हिस्सा नाही. प्रकल्पासाठी मुलभुत सुविधांकरिता येणारा खर्च, जागेची किंमत, आकस्मिक व आस्थापना शुल्क याकरिता महापालिकेमार्फत खर्च करण्यात येणार आहे. पायाभुत कामांसाठी स्वतंत्र निविदा काढणार आहे. या प्रकल्पातील घरांसाठी केंद्र व राज्य सरकारचे अनुदान मिळण्यास आणि लाभार्थ्यांचा हिस्सा जमा होण्यासही काही कालावधी लागेल. त्यामुळे या प्रकल्पातील घरांच्या बांधकाम खर्चासाठी निविदा दर जास्त आल्यास त्या खर्चासाठी तूर्त महापालिकेला खर्च करावा लागेल. केंद्र व राज्य सरकारचा हिस्सा आल्यानंतर तो पुन्हा महापालिकेकडे वळता करून घेता येणार आहे.

राज्य सरकारने दिलेले लक्ष्यांक पुर्ण करण्यासाठी मंजुर झालेल्या प्रकल्पांच्या निविदा काढून कामे सुरू करणे आवश्यक आहे. त्यासाठी महापालिकेमार्फत डुडुळगाव येथील जागेवर पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी 1190 घरे बांधण्याकरिता ठेकेदारांकडून निविदा मागविण्यात आल्या आहेत. स्थापत्य विषयक, विद्युत विषयक कामे मटेरियल टेस्टींगच्या कामांसाठीचा अंदाजित 142 कोटी 89 लाख रूपये खर्च अपेक्षित धरण्यात आला आहे. 13 जानेवारी 2023 पर्यंत निविदा सादर करण्याची मुदत आहे. या कामाची मुदत अडीच वर्षे इतकी राहणार आहे. संबधित ठेकेदाराने मागील सात वर्षामध्ये निविदा रकमेच्या 80 टक्के रकमेचे एक काम, 50 टक्के रकमेची दोन कामे किंवा 40 टक्के रकमेची तीन कामे पूर्ण केलेली असावी. तसेच 40 मीटर उंचीच्या इमारतीचे एक काम स्वतंत्रपणे पूर्ण करणे आवश्यक आहे.