पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांच्या बसचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू

0
102

दि. 16 जुलै (पीसीबी) पुणे : मुंबई-पुणे महामार्गावर पनवेल हद्दीत खाजगी बस आणि ट्रॅक्टरचा भीषण अपघात होऊन बस २० फूट खाली कोसळली. आषाढी एकादशीनिमित्त विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपूरला निघालेल्या ५ भाविकांचा या अपघातात मृत्यू झाला. या बसमधून ५४ जण प्रवास करत होते. यातील ४२ जण जखमी झाले आहेत. जखमींना कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले असून ७ जणांची प्रकृती गंभीर आहे.

मृतांमध्ये बस मधील तिघे आणि ट्रॅक्टर वरील दोघांचा समावेश आहे. बस मधील सर्व प्रवासी हे डोंबिवली मधील रहिवासी होते. खाजगी बस पुढे अचानक ट्रॅक्टर आल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक आहे. नवी मुंबई पोलीस आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी क्रेनच्या मदतीने बसला बाहेर काढले असून मदत कार्य पूर्ण झाल्यावर पुण्याकडे जाणारी लेन वाहतुकीसाठी खुली करण्यात आली.