पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांच्या वाहनांना पथकरातून सूट; चिंचवड येथे सवलत पासचे वितरण सुरू

0
132

दि ५ जुलै (पीसीबी ) – पंढरपूरला जाणार्‍या भाविकांच्‍या वाहनांना पथकरातून सूट देण्‍याचा निर्णय राज्‍य शासनाने घेतला आहे. या वाहनांना पथकरातून सूट मिळावी यासाठी पिंपरी चिंचवड पोलिसांकडून सवलतीच्‍या पासचे वितरण सुरू करण्‍यात आले असल्‍याची माहिती वाहतूक विभागाचे प्रभारी उपायुक्‍त बापू बांगर यांनी दिली.

आषाढी वारीमधील मानाच्या पालख्यांना व वारकरी तसेच भाविकांच्या वाहनांना दिनांक 3 ते 21 जुलै 2024 या कालावधीत पंढरपुरला जाताना व येताना पथकरात सवलत देण्‍याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी करण्‍यासाठी पिंपरी चिंचवड येथून पंढरपुरला जाणारे भाविक, वारकरी तसेच पालख्यांच्या वाहनांना चिंचवडगाव बस स्टॉप, व्यापारी संकुल, पहिला मजला, चिंचवड येथील वाहतुक मुख्यालयातुन तसेच पिंपरी चिंचवड वाहतुक शाखेअंतर्गत असलेल्या वाहतूक विभागातून पथकर सवलत पास उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत.

भाविकांनी या सवलत योजनांचा लाभ घ्‍यावा, असे आवाहन वाहतूक शाखेचे प्रभारी पोलीस उपायुक्‍त बापू बांगर यांनी केले आहे.