पंजाब मध्ये महापुराच रौद्ररूप ! जनजीवन विस्कळीत

0
136

दि.४( पीसीबी)-पंजाबमध्ये निसर्गाचा रौद्रावतार पाहायला मिळत आहे. मागील अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये महापूर आला आहे. नद्या-नाले तुडुंब भरून वाहत असून, शेतांपासून घरांपर्यंत सर्वत्र पाणी घुसल्याने जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे.पूराच्या तडाख्यामुळे आतापर्यंत १०,००० हून अधिक नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं आहे. अनेक ठिकाणी पिण्याच्या पाण्याचा, अन्नाचा आणि औषधांचा तुटवडा जाणवत आहे. अनेक रस्ते खचले आहेत, पूल वाहून गेले आहेत आणि विजेचा पुरवठा खंडित झाला आहे.पंजाबमधील लुधियाना, जालंधर, रोपड, फतेहगड साहिब, मोहाली, आणि होशियारपूर जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीमुळे जनतेचे प्रचंड हाल झाले आहेत. अनेक गावांतून मदतीसाठी हाका मारल्या जात आहेत. सतलज, घग्घर, आणि ब्यास नद्यांचे पाणी धोक्याची पातळी ओलांडून गावांमध्ये शिरले आहे.


पंजाब मध्ये ३७ वर्षांनंतर आलेल्या भीषण पुरामुळे १००० गाव उद्धवस्त झाली आहेत आणि ६१००० हेक्टर जमीन बाधित झाली आहे . पुरग्रस्तांच मदत आणि बचाव कार्य युद्धपातळीवर सुरु आहे. गुरुदासपूर जिल्ह्यातील बहुतांश गावांना पुराचा मोठा फटका बसला आहे. सरकारच्या अक्षमतेमुळे पंजाब मधिल लोक त्रस्त असल्याचा आरोप विरोधी पक्षनेत्यांनी केला आहे. जर केंद्राच्या अखत्यारीतील भाक्रा बियास व्यवस्थापन मंडळाने वेळेवर जून मध्येच पाणी सोडले असते तर हा प्रसंग उद्बभवला नसता असा दावा केला आहे . मुख्यमंत्री भगवंत मान यांनी पूरग्रस्त भागांचा दौरा केला असून, ५०० कोटी रुपयांचा तातडीचा निधी जाहीर करण्यात आला आहे.

त्यांनी स्पष्ट केलं आहे की पूरग्रस्त कुटुंबांना घरबांधणीसाठी, शेतकऱ्यांना नुकसानभरपाईसाठी आणि विद्यार्थ्यांना मदतीसाठी विशेष योजना आखली जाईल.”ही नैसर्गिक आपत्ती मोठी आहे, पण पंजाब सरकार तुमच्याबरोबर आहे. मदतीसाठी तात्काळ निर्णय घेतले जातील.”शालेय शिक्षण, वीजपुरवठा, आरोग्य सेवा आणि वाहतूक व्यवस्था पूर्णपणे विस्कळीत झाली आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत, रेल्वे सेवा उशिराने सुरु आहे आणि इंटरनेट सेवा देखील अंशतः ठप्प झाली आहे. पंजाबमध्ये सध्या पावसाने थैमान घातले आहे. जीवितहानी टळली असली, तरी मालमत्तेचं मोठं नुकसान झालं आहे. प्रशासन, यंत्रणा आणि नागरिक एकत्रितपणे या संकटाला सामोरे जात आहेत. पुढील काही दिवस राज्यासाठी अत्यंत संवेदनशील ठरणार आहेत.हवामान विभागाने पुढील ४८ तास अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. त्यामुळे आणखी पूरस्थिती बळावण्याची शक्यता वर्तवली जात आहे. प्रशासनाने नागरिकांना नदीकाठच्या भागात न जाण्याचं आवाहन केलं आहे.