दि.१९(पीसीबी)-पंजाबमधील तरनतारण जिल्ह्यात धक्कादायक घटना घडली असून सत्ताधारी आम आदमी पक्षाशी संबंधित एका सरपंचाची भर लग्नसोहळ्यात गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. थथियन महंतन गावचे सरपंच हरब्रिंदर सिंग यांच्यावर बुधवारी दुपारी दोन अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला.
मिळालेल्या माहितीनुसार, हरब्रिंदर सिंग हे तरनतारण-बठिंडा राष्ट्रीय महामार्गावरील सिधू फार्म येथे आपल्या चुलत भावाच्या लग्नसमारंभाला उपस्थित होते. ते स्टेजवर नाचत असताना गर्दीतून चार जण पुढे आले आणि त्यांनी अचानक गोळीबार सुरू केला. हल्लेखोरांनी त्यांच्या पोटात आणि डोक्यात चार गोळ्या झाडल्या, ज्यामुळे त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
या वेळी त्यांच्या शेजारी बसलेले चुलत भाऊ जर्मनजीत सिंग यांनी हल्लेखोरांचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्यावरही गोळीबार करण्यात आला. त्यांच्या पोटात गोळी लागल्याने ते गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीने अमृतसरमधील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले
घटनेची माहिती मिळताच पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले आणि परिसर बंदोबस्तात घेतला. सरहाळी पोलिस ठाण्याचे एसएसपी सुरिंदर लांबा यांनी सांगितले की, गुन्हा नोंदविण्यात आला असून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे. आरोपी घटनास्थळावरून फरार झाले असून त्यांचा शोध घेण्यासाठी आसपासच्या सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू आहे.
गावकऱ्यांच्या माहितीनुसार, हरब्रिंदर सिंग हे आम आदमी पक्षाचे सक्रिय कार्यकर्ते आणि पंजाबचे कॅबिनेट मंत्री ललजीत सिंग भुल्लर यांचे निकटवर्तीय होते. विशेष म्हणजे, सुमारे महिनाभरापूर्वी अमृतसर जिल्ह्यातील वलटोहा गावचे सरपंच आणि आप नेते झरमल सिंग यांचीही लग्नसमारंभात गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती.दरम्यान, पंजाब सरकारकडून सुरू असलेल्या “गँगस्टरन ते वार” या अँटी-गँगस्टर मोहिमेदरम्यान ही घटना घडल्याने कायदा-सुव्यवस्थेच्या प्रश्नावर पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.







































