पंचवटी ते पंचवटी साहित्यजागर यात्रा भगूर येथे संपन्न

0
291

पिंपरी, दि. ११(पीसीबी) – पुण्यातील गदिमांचे निवासस्थान ‘पंचवटी’ ते नाशिक येथील कुसुमाग्रजांची पंचवटी अशी पिंपरी – चिंचवडकर साहित्यिकांची साहित्यजागर यात्रा भगूर (जिल्हा नाशिक) येथील स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकापाशी नतमस्तक होत रविवार, दिनांक १० सप्टेंबर २०२३ रोजी संपन्न झाली. शनिवार, दिनांक ०९ सप्टेंबर रोजी आधुनिक महाराष्ट्राचे वाल्मीकी गदिमा यांच्या निवासस्थानी जाऊन साहित्यिकांनी अभिवादन केले; तसेच त्यांच्या स्नुषा शीतल माडगूळकर यांच्याकडून गदिमांच्या संग्रहातील ग्रंथ घेऊन साहित्यजागर यात्रेचा प्रारंभ करण्यात आला.

नाशिक येथील कुसुमाग्रज प्रतिष्ठानला भेट देत यात्रेतील साहित्यिकांनी गदिमांच्या ग्रंथांसोबत आपल्या साहित्यकृतींची एकेक प्रत प्रतिष्ठानकडे सुपुर्द केल्या. प्रतिष्ठानच्या वतीने अरविंद ओढेकर, कविवर्य प्रकाश होळकर, प्राचार्य मकरंद हिंगणे आणि किरण भावसार यांनी साहित्ययात्रेचे स्वागत केले. त्यानंतर पंचवटी परिसरातील त्र्यंबक रस्त्यावरील कुसुमाग्रजांच्या निवासस्थानी जाऊन अभिवादन करण्यात आले. नाशिकचे कवी प्रशांत केंदळे, राजेंद्र उगले यांनी कविता सादर केल्या.

साहित्यजागर यात्रेच्या अंतिम टप्प्यात भगूर येथील स्वातंत्र्यवीर सावरकरांची जन्मभूमी असलेल्या वाड्याला भेट देण्यात आली. याप्रसंगी साहित्यिकांनी उत्स्फूर्तपणे केलेल्या ‘भारतमाता की जय!’ या जयघोषाने रोमांचकारी वातावरणनिर्मिती झाली. तेथे गुणवंत कामगार प्रशांत कापसे, कवी नंदन रहाणे यांनी स्वागत केले. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जन्मस्थळी देशभक्तिपर कविसंमेलनाच्या माध्यमातून स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या कार्याला उजाळा देण्यात आला.

या साहित्ययात्रेत पुरुषोत्तम सदाफुले, तानाजी एकोंडे, सुभाष चव्हाण, कैलास भैरट, सुरेश कंक, शोभा जोशी, नितीन हिरवे, अशोक गोरे, प्रकाश घोरपडे, जयश्री श्रीखंडे, शामराव सरकाळे, हेमंत जोशी, मुरलीधर दळवी, एकनाथ उगले, फुलवती जगताप, भाऊसाहेब गायकवाड, बाळकृष्ण अमृतकर, सुभाष चटणे, संजय गमे, प्रभाकर वाघोले, जयवंत भोसले, सुरेंद्र विसपुते, जयश्री गुमास्ते, विलास कुंभार, सरोजा एकोंडे, सानिका कांबळे, मनीषा उगले, वंदना गायकवाड, प्रतिमा कुंभार, नारायण कुंभार सहभागी झाले होते. श्रीकांत चौगुले यांनी पिंपरी – चिंचवडकर साहित्यिकांची भूमिका मांडली. प्रदीप गांधलीकर यांनी कविसंमेलनाचे सूत्रसंचालन केले. नंदकुमार कांबळे यांनी आभार मानले. वंदे मातरम् म्हणून साहित्ययात्रेचा समारोप करण्यात आला.