मुंबई, दि. ९ (पीसीबी) – भाजपाने पंकजा मुंडे यांना उमेदवारी का नाकारली यावरच राजकिय वर्तुळात अधिक चर्चा रंगली आहे. त्यामागचे खरे कारण आता समोर आले आहे. विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेतेपद द्यायला लागू नये आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना डोईजड होऊ नयेत, यासाठी भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांना भाजपने विधानपरिषदेची उमेदवारी नाकारली आहे. तसेच विधानसभेच्या २०२४ मधील निवडणुकीत त्यांचा परळी विधानसभेतून उमेदवारीसाठी दावा असल्याने विधानपरिषदेसाठी त्यांचे तिकीट कापले गेले, असे समजते.भाजपने विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, प्रदेश सरचिटणीस (संगठन) श्रीकांत भारतीय, प्रदेश उपाध्यक्ष प्रसाद लाड आणि माजी मंत्री राम शिंदे यांना विधानपरिषदेसाठी उमेदवारी जाहीर केली.
राज्यसभेसाठी तीन उमेदवार देणाऱ्या भाजपने विधानपरिषदेसाठीही पाच नेत्यांना उमेदवारी देऊन महाविकास आघाडीला पुन्हा एकदा आव्हान दिले आहे. विधान परिषद निवडणुकीत गुप्त मतदान असल्याने सरकारचे आमदार फोडण्याची संधी भाजपला साधायची आहे.पंकजा मुंडे यांनी विधानपरिषदेसाठी संधी मिळाल्यास सोने करीन, अशी भावना नुकतीच व्यक्त केली होती. पण ‘ जनतेच्या मनातील मुख्यमंत्री ‘ अशी भावना त्यांच्या समर्थकांकडून काही वर्षांपूर्वी व्यक्त झाली होती. त्या वडील गोपीनाथ मुंडे यांच्याप्रमाणेच मोठा जनाधार असलेल्या आणि ओबीसी समाजातील नेत्या आहेत. आता उमेदवारी दिली असती, तर त्यांना विधानसभेसाठी उमेदवारीचा दावा सोडावा लागला असता. त्याचबरोबर त्या २००९ पासून विधानसभेत निवडून येत असल्याने दरेकर यांच्याऐवजी पंकजा मुंडे यांना विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेतेपद द्यावे लागलेे असते. देवेंद्र फडणवीस यांना पंकजा मुंडे डोईजड होण्याचीही भीती होती. त्याचबरोबर मंत्री धनंजय मुंडे यांच्याविरोधात परळीतून लढण्यासाठी भाजपला मजबूत उमेदवाराचीही गरज आहे. त्यामुळे प्रदेश सुकाणू समितीकडून शिफारस होऊनही रात्री उशिरा पंकजा मुंडे यांचे नाव उमेदवार यादीतून कापले गेले. त्यामुळे मंगळवारी रात्री उमेदवारी यादीही जाहीर न होता बुधवारी सकाळी जाहीर झाली.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू नेते दरेकर आणि प्रदेश उपाध्यक्ष प्रसाद लाड यांना पुन्हा उमेदवारी अपेक्षित होती. लाड यांना पाचवे उमेदवार म्हणून अपक्ष व लहान पक्षांकडून मतांची जुळवाजुळव करावी लागेल. हे दोघेही मुंबईतील आहेत.
सोनार, धनगर, ब्राम्हण समाजाला संधी –
ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणावरून राज्यात वातावरण तापले असल्याने धनगर समाजातील नेते व माजी मंत्री राम शिंदे आणि भाजप महिला मोर्च्याच्या प्रदेशाध्यक्षा उमा खापरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. राम शिंदे हे विधानसभा निवडणुकीत पराभूत झाले होते. खापरे या ओबीसी समाजातील असून त्यांनी पिंपरी-चिंचवडमध्ये नगरसेविका म्हणून काम केले आहे. आक्रमक महिला भाजप नेत्या अशी त्यांची ओळख आहे. पंकजा मुंडे यांच्याऐवजी पक्षाने त्यांच्या निकटवर्ती खापरे यांना उमेदवारी दिली. प्रदेश सरचिटणीस श्रीकांत भारतीय हे भाजपमधील जुने आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी घनिष्ठ संबंध असलेले कार्यकर्ते असून ब्राह्मण समाजातील आहेत. त्यांनी फडणवीस यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात त्यांचे विशेष कार्य अधिकारी (ओएसडी) म्हणून काम केले होते.