न्यायालयाचं कामकाज चालू असताना भर कोर्टात न्यायमूर्तींनीच दिला राजीनामा…!

0
298

मुंबई,दि.०५(पीसीबी) – नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती रोहित बी. देव यांनी न्यायालयाचं कामकाज चालू असताना भर कोर्टात आपण राजीनामा दिल्याची घोषणा केली आहे. तसेच, न्यायमूर्तींनी कोर्टासमोर माफीही मागितली आहे.

न्यायमूर्ती रोहित देव यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात न्यायमूर्ती म्हणून सेवा देत होते. गेल्या वर्षी प्राध्यापक जी. एन. साईबाबा यांची नक्षलवाद्यांशी संबंध असल्याच्या खटल्यातून मुक्तता करणाऱ्या घटनापीठाचे ते सदस्य होते. सर्वोच्च न्यायालयाने हाच आदेश रद्दबातल ठरवून या प्रकरणाची पुन्हा सुनावणी करण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या १० ऑगस्टपासून या प्रकरणाची पुन्हा सुनावणी सुरू होणार आहे.

दरम्यान, न्यायमूर्ती रोहित देव यांनी आपल्या राजीनाम्याची घोषणा करतानाच भर कोर्टात माफीही मागितली. “आपण सर्वांनी इथे काम करताना खूप मेहनत घेतली. माझ्या मनात तुमच्या कुणाबद्दलही राग किंवा वाईट भावना नाही. पण मी जर अनवधानाने तुम्हा कुणाला दुखावलं असेल, तर त्यासाठी मी आपली माफी मागतो”, असं न्यायमूर्ती राजीनाम्याची घोषणा करताना म्हणाले.

२०१७मध्ये न्यायमूर्ती रोहित देव यांची उच्च न्यायालयाच्या खंडपीठावर नियुक्ती करण्यात आली होती. त्याआधी ते सरकारी वकील होते. दीड वर्षांनंतर, अर्थात ४ डिसेंबर २०२५ रोजी त्यांचा सेवाकाल समाप्त होणार होता. मात्र. त्याआधीच त्यांनी राजीनामा दिल्यामुळे तर्क-वितर्कांना उधाण आलं आहे.