वाकड, दि. ७ (पीसीबी) – पतीसोबत असलेला वाद न्यायप्रविष्ठ असताना दोघांनी फिर्यादी महिलेला न्याय मिळवून देतो, असे खोटे आमिष दाखवले. त्यातून महिलेकडून वारंवार पैसे घेऊन तिची फसवणूक केली. तसेच महिलेची आणि तिच्या सासरच्यांची भेट घडवून आणली असता सासरच्या लोकांनी महिलेला शिवीगाळ केली. हा प्रकार मे 2022 ते 6 मे 2023 या कालावधीत काळाखडक वाकड येथे घडला.
याप्रकरणी 31 वर्षीय महिलेने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार वाजीद सय्यद, अरविंद कांबळे लखन कांबळे, आणि दोन महिला यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि त्यांचे पती लखन कांबळे यांचा वाद न्यायालयात न्यायप्रविष्ठ आहे. असे असताना फिर्यादीला न्याय मिळवून देतो असे सांगून वाजीद सय्यद आणि एका महिलेने फिर्यादीकडून पाच हजार रुपये घेतले. त्यानंतर पुन्हा पाच हजार रुपये घेतले. त्यानंतर पुन्हा फिर्यादीकडे 10 हजार रुपये मागितले. फिर्यादीचे प्रकरण न्यायप्रविष्ठ असल्याचे माहिती असताना आरोपींनी त्यांचे काम वरिष्ठ पातळीवरून करणार असल्याचे खोटे सांगितले. फिर्यादीकडून वेळोवेळी 30 हजार रुपये घेतले. फिर्यादीने आरोपींकडे पाठपुरावा केल्यानंतर आरोपींनी फिर्यादी आणि सासरच्या लोकांची बैठक घेतली. त्यात सासरच्या लोकांनी फिर्यादीस शिवीगाळ, दमदाटी करून अंगावर धावून गेले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.