न्यायप्रक्रियेतील पारदर्शकता व निष्पक्षता नवोदित वकिलांसाठी प्रेरणादायी!

0
5

– माजी न्यायमूर्ती अंबादास जोशी
पिंपरी, दि. 15 ‘न्यायप्रक्रियेतील पारदर्शकता व निष्पक्षता नवोदित वकिलांसाठी प्रेरणादायी असून युवा पिढीने न्याय, नीतीमत्ता आणि लोकशाही मूल्यांची शिकवण घ्यावी!’ असे आवाहन मुंबई उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश अंबादास जोशी यांनी पिंपरी येथे केले. दर्द से हमदर्द तक संस्था आणि एस.एन.बी.पी. विधी महाविद्यालय, पिंपरी यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक १२ व १३ जुलै रोजी ऑक्सफर्ड शैली राज्यस्तरीय वादविवाद स्पर्धा एस.एन.बी.पी. विधी महाविद्यालय सभागृह, मोरवाडी, पिंपरी येथे ‘कॉलेजियम प्रणाली : शाप की वरदान?’ या विषयावर स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. त्याच्या बक्षीस वितरण समारंभात अंबादास जोशी बोलत होते. कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष ॲड. प्रकाश साळशिंगीकर, मुख्य कार्यकारी अधिकारी सुनीता साळशिंगीकर, सुभद्रा एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षा डॉ. वृषाली भोसले, ॲड. ऋतुजा भोसले, प्राचार्या डॉ. रोहिणी जगताप, उपप्राचार्य कैलाश पोळ, ॲड. सतिश गोरडे यांची प्रमुख उपस्थिती होती.

या स्पर्धेमधे महाराष्ट्रभरातून वेगवेगळ्या विधी महाविद्यालयांतीलसुमारे २८ संघांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेमध्ये परीक्षक म्हणून काही विधी महाविद्यालयाचे प्राध्यापक आणि मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश यांनी काम पाहिले होते. स्पर्धेमध्ये पूर्व प्राथमिक आणि अंतिम फेरी असे दोन टप्पे होते. प्रत्येक संघाने उत्तमरीत्या युक्तिवाद केले. या स्पर्धेच्या अंतिम फेरीसाठी मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश अंबादास जोशी आणि मुंबई विद्यापीठाच्या प्रा. डॉ. रश्मी ओझा, ॲड. मदनलाल छाजेड, ॲड. सुहास पडवळ, ॲड. राजेश पुणेकर यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. या स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांनी उत्तम प्रकारे युक्तिवाद करून स्पर्धेची रंगत वाढवली. अंतिम स्पर्धेमध्ये बालाजी विधी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी जोरदार युक्तिवाद करून प्रथम क्रमांकाचे बक्षीस पटकावले. विजेत्या संघाला रोख ३००००/- रुपये, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र प्रदान करून गौरविण्यात आले; तसेच उपविजेत्या संघांना रोख रक्कम २००००/- रुपये, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र प्रदान करून गौरविण्यात आले.
उपविजेतेपदासाठीमुंबईच्या के.ई.एस. आणि पी.जी.सी.एल. या महाविद्यालयांनी बाजी मारली. युविका धामने (उत्कृष्ट वक्ती)
आणि तेजस घोलेकर (उत्कृष्ट प्रतिवादी) ठरले. त्यांना प्रत्येकी ५०००/- रुपये बक्षीस देऊन गौरविण्यात आले. नियोजनात ॲड. हिमांशु माने, ॲड. संकेत राव, ॲड. सोहम यादव, ॲड. आशिष गोरडे, ॲड. ओंकार पाटील, ॲड. नितीन हजारे, ॲड. नारायण अशी यांनी परिश्रम घेतले. प्रा. अर्पिता गोस्वामी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले आणि आभार मानले.