नौशाद शेखवर आणखी एक गुन्हा

0
333

रावेत, दि. ५ (पीसीबी) – दहावीतील अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी बेड्या ठोकण्यात आलेल्या नौशाद अहमद शेख (वय 58) याच्याविरोधात शनिवारी (दि. 3) आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला.

शेख याच्या शैक्षणिक संस्थेत शिक्षण घेत असलेल्या अल्पवयीन मुलीसोबत गैरवर्तन करून तिचा विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. पीडित विद्यार्थिनीने याप्रकरणी रावेत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शेख याने पीडित मुलीसोबत गैरवर्तन करून तिच्या मनास लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य केले. अल्पवयीन मुलीचा विनयभंग केला. याबाबत मुलीने भितीपोटी कोणालाही काही सांगितले नाही. दरम्यान, शेख याने लैंगिक अत्याचार केल्याची तक्रार एका अल्पवयीन विद्यार्थिनीने केली. त्यानुसार 30 जानेवारी रोजी रावेत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

त्यानंतर पोलिसांनी शेख याला अटक केली. त्याला सोमवारपर्यंत (दि. 5) पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. दरम्यान, याप्रकरणी पोलिसांनी क्रिएटिव्ह अकॅडमी या निवासी शाळेतील विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांशी चर्चा केली. तसेच त्यांचे समुपदेशन करून गैरप्रकार झाला असल्यास तक्रारीसाठी पुढे येण्याचे आवाहन केले.
त्यामुळे पीडित विद्यार्थिनीने गैरप्रकार झाल्याचे सांगितले. त्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रावेत पोलीस तपास करीत आहेत.