कणकवली, दि. २७ (पीसीबी) – नोटांवर गांधींजींच्या फोटोसह लक्ष्मी आणि विघ्नहर्त्या गणेशाचा फोटोही असावा, अशी मागणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केल्याने. देशासह राज्यात नव्या वादाला तोंड फुटले आहे. दरम्यान, भाजप नेते नितेश राणे यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जागी छत्रपती शिवाजी महाराज यांचा फोटो असलेली नोट शेअर केला. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.
कणकवलीचे आमदार नितेश राणे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा फोटो असलेली दोनशे रूपयांची नोट शेअर केली आहे. आमदार नितेश राणे यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जागी छत्रपती शिवाजी महाराज यांचा फोटो असलेली नोट शेअर केली आहे. त्याला राणे यांनी ‘ये परफेक्ट है’ अशी कॅप्शन दिली आहे. त्यामुळे सर्वत्र खळबळ माजली आहे. तर दुसरीकडे कॉंग्रेस नेत्यांनी बाबासाहेब आंबेडकर यांच्या फोटोची मागणी केली आहे. त्यामुळे अरविंद केजरीवाल यांच्या वक्तव्याला नवं वळण लागलं आहे.
केजरीवाल यांच्या या विधानाचा संबंध थेट गुजरात निवडणुकीशी लावला जात असून केजरीवाल गुजरातमध्ये हिंदुत्वाचं कार्ड खेळणार असल्याचं बोललं जात आहे.मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पत्रकार परिषद घेऊन ही मागणी केली.
केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना माझी विनंती आहे की, त्यांनी भारतीय चलनावर एका बाजूने महात्मा गांधी आणि दुसऱ्या बाजूला लक्ष्मी तसेच गणेशाची प्रतिमा छापावी. सर्वच नोटा बदलाव्यात असं आम्ही म्हणत नाही. पण ज्या नोटा छापल्या जाणार आहेत, त्यावर लक्ष्मी आणि गणेशाची प्रतिमा असावी, असं अरविंद केजरीवाल यांनी म्हटलं आहे.