नोटांवर देवदेवतांचे काय काम

0
204

नवी दिल्ली, दि. २८ (पीसीबी) – दिल्लीचे मुख्यमंत्री यांनी देशाची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी नोटांवर गणपती – लक्ष्मीचा फोटो लावण्याची मागणी केली. त्यानंतर त्या विधानाची देशभर चर्चा सुरु झाली. प्रत्येकजण वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया देऊन नोटांवर कुणाचा फोटो असायला हवा. याविषयी सांगू लागला. काहींनी छत्रपती शिवाजी महाराज, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो असावा. अशी प्रतिक्रिया दिली आहे.

यासगळ्यात बॉलीवूडचा प्रसिद्ध संगीतकार विशाल ददलानीनं दिलेल्या प्रतिक्रियेची सोशल मीडियालर चर्चा आहे. यापूर्वी देखील विशालनं दिलेल्या प्रतिक्रियेवरुन सोशल मीडियावर नेटकऱ्य़ांनी त्याला ट्रोल केल्याचे दिसून आले आहे. आता विशालनं केजरीवाल यांच्यावर तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे. विशाल हा नेहमीच त्याच्या परखड प्रतिक्रियेसाठी ओळखला जातो. बऱ्याचशा राजकीय नेत्यांनंतर त्यानेही दिलेल्या प्रतिक्रियेची चर्चा आता सुरु झाली आहे.

ददलानीनं कुणाचंही नाव घेता आपलं म्हणणं ट्विटवर मांडले आहे. तो म्हणतो, भारताचे एवढे मोठे संविधान आहे. आपण धर्मनिरपेक्ष लोकशाही स्विकारुन भारतात राहत आहोत. त्यानुसार आपले सर्व प्रशासकीय व्यवहारही सुरु आहेत. अशातच जेव्हा कुणी वेगळी प्रतिक्रिया देऊन त्या प्रशासकीय सेवेत अथवा प्रशासनात बाधा आणत असल्यास विकासाला खिळ बसते. हे आपण ध्यानात घेण्याची गरज आहे. नोटेवरील ते विधानही मला तसेच वाटते.

मुळात आपल्याला कसली गरज आहे हे ओळखावे. प्रशासनात धर्माचे काम काय हा प्रश्न जास्त महत्वाचा आहे. कुठलीही व्यवस्था सुरु राहावी यासाठी योग्य त्या अनुशासन, नियम यांची गरज असते. त्याशिवाय ते सुरु राहत नाही. योग्य प्रकारे काम करत नाही. नोटांवर देवदेवांचा फोटो लावून विकास होणार आहे का, असा सवाल ददलानीनं अप्रत्यक्षपणे आपल्या त्या व्टिटमधून उपस्थित केला आहे.