नोटांचा पाऊस, २५ कोटींची रोकड जप्त

0
199

दि ६ मे (पीसीबी ) – देशभरात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु असताना झारखंडची राजधानी रांचीमध्ये सक्तवसुली संचलनालयाचं (ईडी) धाडसत्र सुरु आहे. मंत्री आलमगीर आलम यांच्या स्वीय सचिवाच्या नोकऱ्याच्या घरावर छापा टाकण्यात आला. त्यात मोठ्या प्रमाणात रोकड हाती लागली आहे. प्राथमिक माहितीनुसार, ईडीच्या हाती जवळपास २५ कोटी रुपयांची रोख रक्कम लागली आहे. मनी लॉण्ड्रिंग प्रकरणात आलमगीर आलम यांचं नाव समोर आलं होतं. त्यानंतर ईडीनं तपास सुरु केला.

आलमगीर आलम यांच्या मंत्रालयात भ्रष्टाचार सुरु असल्याची माहिती ईडीला मिळाली होती. भ्रष्टाचाराचा पैसा नोकरांच्या घरी जात असल्याची टिप ईडीच्या अधिकाऱ्यांना मिळाली. त्यानंतर मंत्र्यांच्या स्वीय सहायकाच्या नोकराच्या घरी छापा टाकण्यात आला. या नोकराला दरमहा १५ हजार रुपये पगार मिळतो. पण त्याच्या घरी कुबेराचा खजिना सापडला. घरात सापडलेली रोकड मोजण्यासाठी नोटा मोजण्याच्या मशीन मागवण्यात आल्या.

गेल्या वर्षीच्या मे महिन्यात मुख्य अभियंत्याच्या घरावर १० हजारांच्या लाच प्रकरणी छापा टाकला होता. त्यावेळी त्याचा जबाब नोंदवण्यात आला. मंत्र्यांकडे लाचेचा पैसा कसा पोहोचवला जातो याची इंत्यभूत माहिती त्यानं दिली. त्यानंतर झारखंडचे ग्राम विकास मंत्री आलमगीर आलम यांचं नाव पहिल्यांदा भ्रष्टाचार प्रकरणात समोर आलं. या प्रकरणाचा तपास सुरु असताना आलमगीर यांचे स्वीय सचिव संजीव लाल यांचं नाव समोर आलं. संजीव लाल यांच्याकडे घरकाम करणाऱ्या नोकराच्या घरावर धाड टाकण्यात आली. तेव्हा तिथे कोट्यवधींची रोकड सापडली.

कोण आहेत आलमगीर आलम?
आलमगीर आलम पाकुड विधानसभेचे काँग्रेसचे आमदार आहेत. ते चार टर्मचे आमदार आहेत. सध्या त्यांच्याकडे झारखंड सरकारमध्ये संसदीय कार्य आणि ग्राम विकास मंत्रालयाची जबाबदारी आहे. त्याआधी २० ऑक्टोबर २००६ ते १२ डिसेंबर २००९ या कालावधीत ते विधानसभेचे अध्यक्ष राहिले आहेत. सरपंच पदाची निवडणूक जिंकून त्यांनी राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. २००० मध्ये ते पहिल्यांदा आमदार झाले. आतापर्यंत ते चारवेळा विधानसभा निवडणूक जिंकले आहेत.