नोकरीच्या बहाण्याने निवृत्त पोलिसालाच घातला दोन लाखांचा गंडा

0
224

चिखली, दि. १७ (पीसीबी) – मुलाला नोकरी लावण्याच्या बहाण्याने दोघांनी मिळून एका निवृत्त पोलिसाला दोन लाखाचा गंडा घातला. हा प्रकार डिसेंबर 2018 ते 16 सप्टेंबर 2022 या कालावधीत शरदनगर, चिखली येथे घडला.

भगवान गेनू म्हस्के (वय 57, रा. शरदनगर, चिखली) यांनी याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार संजय धोंडिबा पवार, ठकसेन धोंडिबा पवार (दोघे रा. जेऊर, ता. पुरंदर, पुणे) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा मुलगा प्रतीक हा नोकरीच्या शोधात असताना त्याची आरोपींशी ओळख झाली. आरोपींनी आपसात संगनमत करून संजय पवार याची पश्चिम महाराष्ट्रातील एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांसोबत ओळख आहे. त्याने बऱ्याच मुलांना नोकरीला लावले आहे. नोकरीला लावण्यासाठी प्रत्येकी चार ते पाच लाख रुपये आम्ही घेतो, असे फिर्यादींना सांगितले. पण तुम्ही ओळखीचे असल्याने तुमच्या मुलाचे दोन लाख रुपयात नोकरीचे काम करून देतो, अशी खात्री आरोपींनी दिली. आरोपींवर विश्वास ठेऊन फिर्यादींनी आरोपीच्या बँक खात्यात दोन लाख रुपये जमा केले. पैसे घेतल्यानंतर फिर्यादींच्या मुलाला नोकरी न लावता त्यांची फसवणूक केली. चिखली पोलीस तपास करीत आहेत.