‘नॉर्वे’तील तंत्रज्ञानाचा वापर केल्यास घनकचरा व्यवस्थापनास मदत होईल’

0
510

पिंपरी दि. ११ (पीसीबी) – पिंपरी-चिंचवड शहरामध्ये  प्रगत तंत्रज्ञाचा अवलंब करून विविध प्रकल्प उभारल्यास नागरिकांना चांगल्या पायाभूत सुविधा उपलब्ध करून देता येऊ शकतात. नॉर्वे देशाने बांधकाम राडारोडा आणि प्लास्टिक पुनर्वापरा विषयीचे तंत्रज्ञान विकसित केले आहे. या तंत्रज्ञानाचा वापर पिंपरी-चिंचवड शहराने केल्यास घनकचरा व्यवस्थापन  योग्य पद्धतीने करण्यास मदत होईल असे मत कॉन्सूलेट जनरल अर्न जान फ्लोलो यांनी व्यक्त केले.

बांधकाम राडारोडा आणि प्लास्टिकच्या पुनर्वापराविषयी  नॉर्वे देशातील तंत्रज्ञानाबाबत माहिती देण्यासाठी तसेच त्या दृष्टीने भारतातील शहरांमध्ये अशा कंपन्यांची गुंतवणूक करण्याच्या अनुषंगाने आज (बुधवारी) फ्लोलो यांच्या नेतृत्वाखाली तीन सदस्यीय शिष्टमंडळाने पिंपरी -चिंचवड महापालिकेला भेट दिली.

यामध्ये सिंटेफ कंपनीचे वरिष्ठ शास्त्रज्ञ ख्रिस्तीन एजेलसण, तोम्रा सिस्टीम कंपनीचे प्रतिनिधी गार्गी पारीख तसेच नॉर्वे दूतावासाचे आर्थिक आणि परराष्ट्र नीती  खात्याचे भारतातील  सल्लागार राहुल माहेश्वरी यांचा समावेश होता. शिष्टमंडळ आणि महापालिका अधिकारी यांच्या समवेत टाकाऊ वस्तूंच्या पुनर्वापराविषयी विस्तृत चर्चा झाली. आयुक्त राजेश पाटील यांनी शिष्टमंडळाचे स्वागत केले.  या नंतर झालेल्या बैठकीत शिष्टमंडळ आणि महापालिका अधिकारी यांच्या समवेत टाकाऊ वस्तूंच्या पुनर्वापराविषयी विस्तृत चर्चा झाली. यावेळी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, जितेंद्र वाघ, शहर अभियंता मकरंद निकम, सह शहर  अभियंता संजय कुलकर्णी, रामदास तांबे, श्रीकांत सवणे, प्रमोद ओंभासे, मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी  नीलकंठ पोमण, उप आयुक अजय चारठाणकर,  कार्यकारी  अभियंता नितीन देशमुख, बापूसाहेब गायकवाड, सी.एस.आर सेलचे सल्लागार विजय वावरे, जनसंपर्क अधिकारी किरण गायकवाड आदी उपस्थित होते.

नॉर्वे  येथील सिंटेफ आणि तोम्रा कंपनीच्या वतीने संगणकीय सादरीकरणाद्वारे बांधकाम राडारोडा आणि प्लास्टिकच्या पुनर्वापरा बद्दल माहिती देण्यात आली. भारतातील विविध शहरांमध्ये सद्यस्थितीत असलेल्या टाकाऊ वस्तूंच्या  पुनर्वापरासंबंधीच्या विविध प्रकल्पाविषयी तसेच पुनर्वापर करून कशा प्रकारे टाकाऊ वस्तूपासून वापरात येणाऱ्या वस्तू बनविता येतील याबाबत माहिती देण्यात आली.