नॉन मोटराइज्ड ट्रान्सपोर्ट’ धोरणामुळे शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यास मदत होणार – प्रशासक शेखर सिंह

0
324

‘नॉन मोटराइज्ड ट्रान्सपोर्ट’ धोरण अंमलबजावणीसाठी महापालिका व आयटीडीपी संस्थेमध्ये सामंजस्य करार

पिंपरी, दि. १३ (पीसीबी) :- पिंपरी चिंचवड शहरामध्ये ‘नॉन मोटराइज्ड ट्रान्स्पोर्ट(एनएमटी)’ या धोरणाची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि आयटीडीपी संस्था (Institute of Transport and Development policy) यांच्यामध्ये सामंजस्य करार करण्यात आला. या कराराच्या माध्यमातून शहरातील नागरिकांमध्ये ‘नॉन मोटराइज्ड ट्रान्स्पोर्ट’ या विषयासंबंधित जनजागृती करण्यात येणार आहे. तसेच सुरक्षित वाहतुकीला प्रोत्साहन देण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येणार असून शहरातील वाहतूक कोंडीचे प्रमाण कमी होण्यास मदत होणार आहे, अशी माहिती महापालिका आयुक्त् तथा प्रशासक शेखर सिंह यांनी दिली.

महापालिका आयुक्त् यांच्या दालनात प्रशासक शेखर सिंह यांच्या स्वाक्षरीने हा करार करण्यात आला. या सामंजस्य कराराच्या प्रसंगी स्मार्ट सिटीचे मा. सह-मुख्य कार्यकारी अधिकारी किरणराज यादव, शहर अभियंता तथा स्मार्ट सिटीचे सह-मुख्य कार्यकारी अधिकारी(एबीडी) मकरंद निकम, मुख्य वित्त अधिकारी सुनील भोसले, कंपनी सेक्रेटरी श्रीमती चित्रा पंवार, कार्यकारी अभियंता प्रमोद ओंभासे, बापूसाहेब गायकवाड, सुनिल पवार, आशिक जैन, आयटीडीपी संस्थेच्या वतीने श्रीम. अस्वथी दिलीप, प्रांजल कुलकर्णी यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते.

आयटीडीपी (ITDP) ही संस्था जगभरातील शहरांमध्ये सुरक्षित, आधुनिक आणि कार्यक्षम सार्वजनिक वाहतूक व्यवस्थांना प्रोत्साहन देण्यासाठी कार्य करते. पिंपरी चिंचवड महापालिका सोबतच्या सामंजस्य कराराच्या अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांमुळे प्रदूषणाची पातळी घटण्यास देखील सहाय्यक ठरणार आहे. भारतासाठी महत्वाकांक्षी स्मार्ट सिटी मिशन आणि आगामी मेट्रो लाइन्सची यशासाठी नॉन-मोटरड ट्रान्सपोर्ट यानी गैर-मोटर चालित वाहनांवर लक्ष केंद्रित करणे महत्त्वाचे असून त्यासाठी हा करार फायदेशीर ठरणार असल्याचे आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी सांगितले