नैतिकदृष्ट्या भाजपचा पराभवच – अजित गव्हाणे

0
295

पिंपरी, दि. 2 (पीसीबी) – चिंचवड विधानसभेच्या पोटनिवडणुकीत भाजपने साम, दाम, दंड, भेदाचा केलेला वापर, सत्तेचा गैरवापर, पैशांचा महापूर निर्माण केल्यानंतरही त्यांना 2019 च्या तुलनेत 15 हजार मते कमी पडली. तर विरोधातील मतांमध्ये 30 हजारांची वाढ झाली हे आजच्या मतमोजणीतून स्षष्ट झाले आहे. त्यामुळे भाजपचा चिंचवडमध्ये नैतिकदृष्ट्या पराभवच झाला आहे, अशी प्रतिक्रीया राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी दिली आहे.

चिंचवड विधानसभा निवडणुकीची आज मतमोजणी पूर्ण झाली. राष्ट्रवादीचे उमेदवार नाना काटे यांना तब्बल 1 लाखांच्या आसपास मते पडली. यानंतर अजित गव्हाणे यांनी ही प्रतिक्रीया दिली आहे. अजित गव्हाणे म्हणाले, महाविकास आघाडीचे उमेदवार नाना काटे यांना मिळालेली मते ही लक्षणीय आहेत. बंडखोर उमेदवाराची मते आणि नाना काटे यांच्या मतांची बेरीज केल्यास ती अश्विनी जगताप यांच्यापेक्षा अधिक होतात. या पोटनिवडणुकीत भाजपने सत्तेचा गैरवापर केल्यानंतरही त्यांना 2019 च्या तुलनेत 15 हजार मते कमी पडली आहे. विशेष म्हणजे गतवेळच्या निवडणुकीपेक्षा 9 हजारांनी मतदान अधिक झाल्यानंतरही त्यांना कमी पडलेली मते म्हणजे जनतेचा कौल हा भाजप विरोधातील आहे.

शेवटच्या तीन-चार दिवसांत भाजपने लोकशाही धुळीस मिळविण्याचे काम केले. आमच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करत दहशत निर्माण केली. शिवसेनेच्या शहराध्यक्षांना मारहाण करण्यात आली, त्यानंतरही राष्ट्रवादीचे नाना काटे यांनी एक लाख मते मिळविल्याने पुढील प्रत्येक निवडणुकीत आमचा विजय निश्चित आहे.

आम्हाला 2014 च्या तुलनेत 60 हजार अधिकची मते मिळालेली आहे. हाच ट्रेंड येणार्‍या महापालिका निवडणुकीत दिसून येईल. महाविकास आघाडीने ही निवडणूक एकदिलाने लढविल्याने मतांची आकडेवारी वाढली आहे. एकास एक अशी लढत झाली असती तर विजय आमचाच झाला असता. या निवडणुकीत सुरु झालेली भाजपची घसरण कायम राहिल आणि महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादीचेच नगरसेवक अधिक निवडून येतील व महापालिकेत सत्ता येईल, असा विश्वासही गव्हाणे यांनी यावेळी व्यक्त केला.