नेमबाजीत मनु भाकरला दुसरे कास्य

0
188

दि. ३० जुलै (पीसीबी) – पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत भारताच्या मनु भाकरने इतिहास रचला आहे. एकाच स्पर्धेत दोन पदकं मिळवणारी पहिली भारतीय खेळाडू ठरली आहे. अशी कामगिरी यापूर्वी कोणत्याही भारतीयाच्या नावावर नाही. मनु भाकरने वैयक्तिक 10 मीटर एअर पिस्टल फेरीत पहिलं कांस्य पदक मिळवलं होतं. त्यानंतर आता 10 मीटर एअर पिस्टल मिक्स्ड प्रकरात दुसरं कांस्य पदक मिळवलं आहे. यासह मनु भाकरने काही विक्रमांची नोंद केली आहे. भारताकडून पहिली महिला नेमबाज असून तिने पदक मिळवलं आहे. स्वातंत्र्यानंतर एकाच ऑलिम्पिकमध्ये दोन पदकं मिळवणारी पहिली आणि एकमात्र भारतीय खेळाडू ठरली आहे. पदक मिळवल्यानंतर मनु भाकरने आपल्या भावनांना मोकळी वाट करून दिली. ‘मला हे पदक जिंकल्याचा अभिमान आहे. मी सर्वांचे आभार व्यक्त करते. हा फक्त आशीर्वाद आहे. सर्वांच्या आशीर्वाद आणि प्रेमासाठी खूप खूप धन्यवाद. जे काही आमच्या हातात आहे ते आम्ही फक्त नियंत्रित करू शकतो. मी येथे येण्यापूर्वी वडिलांशी याबाबत बोलली होती आणि ठरवलं होतं की शेवटच्या शॉटपर्यंत लढा द्यायचा.’

दुसरीकडे, मिक्स्ड डबलमध्ये मनु भाकरचा 22 वर्षीय साथीदार सरबजोत सिंहने पहिलं मेडल जिंकल्यावर आनंद व्यक्त केला आहे. त्याने आपल्या भावना व्यक्त करताना सांगितलं की, ‘खूप छान वाटत आहे.सामना कठीण होता. आनंद आहे की आम्ही विजय मिळवण्यात यशस्वी ठरलो. खूप दबाव होता. पण प्रेक्षकवर्ग चांगला होता.’ या सामन्यात सरबजोत सिंहने निराशा केली. पण मनु भाकरने जराही डगमगळी नाही आणि फॉर्म कायम ठेवला. या दोघांनी मिळून कोरियन जोडीला पराभूत केलं. भारताने कांस्य पदक जिंकताच टाळ्यांच्या कडकडाटासह जल्लोष करण्यात आला.

पहिल्या सेटमध्ये कोरियाचं वर्चस्व दिसून आलं होतं. त्यामुळे भारतीय क्रीडारसिकांच्या पोटात गोळा आला होता. पण त्यानंतर या जोडीने कमबॅक केलं आणि सलग पाच सेट नावावर केले. दरम्यान, मनुने एकाच ऑलिम्पिकमध्ये दोन पदकं मिळवली आहे. यासह ती दोन पदकं मिळवणाऱ्या भारतीय खेळाडूंच्या पंगतीत बसली. सुशील कुमार आणि पीव्ही सिंधु यांनी दोन वेगवेगळ्या ऑलिम्पिकमध्ये पदकं मिळवली आहेत. सुशील कुमारने बीजिंग ऑलिम्पिकमध्ये कांस्य आणि लंडन ऑलिम्पिकमध्ये रजत पदक मिळवलं होतं. तर पीव्ही सिंधुने रियो ऑलिम्पिकमध्ये रजत आणि टोक्यो ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक पटकावलं होतं.