भोसरी, दि. 05 (पीसीबी) : नेपाळ, काशी, अयोध्या येथे यात्रेसाठी नेण्याचे आमिष दाखवून पैसे घेत एका वृद्ध व्यक्तीची दोन लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली. ही घटना एक जून ते 12 जून या कालावधीत मोशी येथे घडली. भिकन एकनाथ दुसाने (वय 69, रा. मोशी) यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सिद्धेश टूर्स अँड ट्रॅव्हल्स भुसावळ याचे मालक महेश बारसू फालक याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी महेश फालक याने दुसाने यांना नेपाळ, काशी, अयोध्या येथे यात्रेसाठी नेण्याचे आमिष दाखविले. त्यासाठी दुसाने आणि त्यांच्या नातेवाईकांकडून दोन लाख दोन हजार 500 रुपये घेतले. प्रवास सुरू होण्यापूर्वी 20 दिवस अगोदर कळविल्यास तिकीट रद्द करून सर्व पैसे परत देतो असे दुसाने यांना सांगण्यात आले. दरम्यान आरोपीने दुसाने यांचे रेल्वेचे तिकीट बुक केले नाही. तसेच त्यांनी भरलेले दोन लाख दोन हजार 500 रुपये त्यांना परत न देता त्यांची फसवणूक केली. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.