पिंपरी, दि. १७ (पीसीबी) – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा व्यापक विस्तार, केलेली व करण्यात येत असलेली विकासकामे आणि लोकभिमुख दृष्टीकोन पाहून आमचा आत्मविश्वास वाढला असून भविष्यात ही महापालिका कामकाजाच्या बाबतीत अव्वल दर्जा प्राप्त करेल याची खात्री असल्याचे मत नेपाळमधील बिरेंद्रनगर नगरपालिकेच्या नगराध्यक्षा मोहनमाया भंडारी यांनी व्यक्त केले.
नेपाळ येथील शिष्ठमंडळाने पिंपरी चिंचवड महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीस भेट दिली.आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी त्यांचे स्वागत केले आणि विकास कामांबाबत शिष्ठमंडळास माहिती दिली. त्यावेळी आयुक्तांशी चर्चा करताना त्या बोलत होत्या.
शिष्ठमंडळाचे स्वागत करताना महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे, उल्हास जगताप, कार्यकारी अभियंता बापूसाहेब गायकवाड, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, वास्तू विशारद आणि शहरी प्रकल्प सल्लागार तथा बायसिकेल मेयर आशिक जैन, आय. टी. डी.पी चे उप व्यवस्थापक प्रांजल कुलकर्णी उपस्थित होते.
या शिष्टमंडळात नेपाळमधील माजी पर्यटन मंत्री यमलाल कांडेल, बिरेंद्रनगर नगरपालिकेच्या उपनगराध्यक्ष निळकंठ खनाल, प्रशासकीय विभाग प्रमुख प्रकाश टंक लमिच्छ्|ने,प्रकल्प व्यवस्थापक प्रतिष्ठा कांडेल, प्रकल्प अधिकारी अलिशा कारकी यांचा समावेश होता.
आयुक्त शेखर सिंह यांनी शिष्टमंडळास माहिती देताना महापालिका राबवत असलेले प्रकल्प, शहरातील वाहतूक, पार्किंग व्यवस्था , शहरातील पादचारी व सायकल मार्ग याचे नियोजन, पाणीपुरवठा आणि जलनिसारण आदींबाबत नागरिकांचा सहभाग घेऊन करीत असलेल्या उपयायोजनांविषयी सविस्तर माहिती दिली.