नेत्र, दंत तपासणी व रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

0
2

– श्री मोरया गोसावी महाराज संजीवन समाधी सोहळ्यात जोपासली सामाजिक बांधिलकी

– २८६ नागरिकांची नेत्र व १६९ नागरिकांची दंत तपासणी तर १२५ रक्तपिशव्याचे संकलन

चिंचवड, दि. 19 (पीसीबी)  – चिंचवड येथील श्रीमन महासाधु श्रीमोरया गोसावी महाराज यांच्या ४६३व्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या धार्मिक कार्यक्रमांसह या सोहळ्यात मोरया भक्तांसाठी दंत व नेत्र तपासणी आणि रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्याचबरोबर यावेळी उपस्थित गणेश भक्तांच्या सहकार्याने ‘श्रीं’चा सामुदायिक महाअभिषेकही यावेळी संपन्न झाला.

माजी नगरसेविका अश्विनी गजानन चिंचवडे यांच्या वतीने या शिबिराचे व सामुदायिक महाअभिषेक पूजेचे आयोजन केले होते.

या शिबिरात सुमारे २८६ नागरिकांनी नेत्र तपासणी शिबिराचा तर १६९ नागरिकांनी दंत शिबिराचा लाभ घेतला. नेत्र शिबिरासाठी डॉ. शरद चव्हाण, डॉ रवींद्र चव्हाण यांचे सहकार्य लाभले. तसेच नेत्र तपासणी शिबिरासाठी डॉ. गौरी पाटील व त्यांच्या सहकारी तुमचे सहकार्य लाभले.

यावेळी आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरातही युवकांनी तसेच मोरया भक्तांनी स्वयंस्फूर्तीने सहभागी होत रक्तदान केले. यावेळी सुमारे १२५ रक्तपिशव्यांचे संकलन करण्यात आले. या संपूर्ण शिबिराचे नियोजन राजू शिवतरे यांनी केले होते.

दरम्यान, या शिबिरापूर्वी सकाळी संकष्टी चतूर्थीचे औचित्य साधून अश्विनी चिंचवडे यांच्या वतीने ‘श्रीं’च्या सामुदायिक महाअभिषेक पूजेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शेकडो गणेश भक्तांनी या पूजेत भाग घेत ‘श्रीं’चा विधिवत सामुदायिक महाअभिषेक केला.