नेत्यांना वेळ नसल्याने उद्घाटन रखडले?, काम पूर्ण होऊनही वाढीव पाणी मिळेना

0
233

पिंपरी, दि. 26 (पीसीबी) – मागील तीन वर्षांपासून दिवसाआड पाणीपुरवठ्याला सामोरे जात असलेल्या शहरवासीयांना नेत्यांना वेळ नसल्याने वाढीव पाणी मिळण्यास विलंब होत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. चिखली जलशुध्दीकरण केंद्र आणि निघोजेतील जॅकवेलचे काम पूर्ण झाले असून केवळ उद्घाटनामुळे वाढीव पाण्याचा मार्ग अडकला. नोव्हेंबर अखेर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या प्रकल्पाचे उद्घाटन होणार होते, मात्र गुजरात निवडणुकीमुळे रखडले ते रखडलेच. आता नवीन वर्षातच शहरवासीयांना वाढीव पाणी मिळेल. त्यावेळी न्यू इअर गिफ्ट दिल्याचे दावे केले जातील. पण, महिनाभर केवळ नेत्यांना वेळ नसल्याने शहरवासीयांना वेठीस धरले त्याला जबाबदार कोण? असा सवाल केला जात आहे.

पिंपरी-चिंचवड शहराला गेल्या तीन वर्षांपासून एक दिवसाआड पाणी पुरवठा सुरू आहे. शहराला मावळातील पवना धरणातून 510 एमएलडी पाणी मिळते. हे पाणी महापालिका पवना नदीवरील रावेत बंधाऱ्यावरून उचलते. मात्र, शहराच्या वाढत्या लोकसंख्येमुळे पाण्याची मागणीही वाढली आहे. त्यामुळेच शहरातील विविध भागातील रहिवाशांना पाणी समस्येला तोंड द्यावे लागत आहे. यावर उपाय योजना म्हणून महापालिकेने भामा-आसखेड धरणातून 167 तर आंद्रा धरणातून 100 असे 267 एमएलडी पाणी आणण्याचे नियोजन केले आहे.

आंद्रा आणि भामा आसखेड प्रकल्पातून उचलण्यात येणा-या 267 दशलक्ष लिटर (एमएलडी) पाण्यावरील प्रक्रियेसाठी महापालिकेच्या वतीने चिखलीत आठ हेक्टर परिसरात उभारण्यात येत असलेल्या जलशुद्धीकरण केंद्राचे काम पूर्ण झाले आहे. पहिल्या टप्यात आंद्रा धरणातून 100 एमएलडी पाणी उचलण्यासाठी निघोजे येथील इंद्रायणी नदीवर अशुद्ध जलउपसा केंद्राचे (जॅकेवल) बांधण्यात आले असून त्याचे काम पूर्ण झाले आहे. निघोजे बंधा-यातून पाणी उचलून चिखलीत शुद्ध करुन समाविष्ट भागातील गावांना पहिल्या टप्प्यात पाणीपुरवठा केला जाणार आहे.

जलशुद्धीकरण केंद्र आणि निघोजे बंधा-याचे काम पूर्ण झाले आहे. या दोनही प्रकल्पाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे हस्ते नोव्हेंबर अखेर करण्याचे नियोजित केले होते. पण, त्यावेळी गुजरात निवडणूक असल्याने फडणवीस यांनी शहरासाठी वेळ दिला नाही. त्यामुळे उद्घाटन रखडले. त्याला एक महिना होऊन गेला. तरी, उद्घाटनाला मुहूर्त मिळाला नाही. आता हिवाळी अधिवेशन सुरु असल्याने मंत्री तिकडे व्यस्त आहेत. पालकमंत्री चंद्रकांत पाटील दर शनिवारी, रविवारी पुण्यात असतात. पण, पिंपरी-चिंचवडमधील भाजप पदाधिकारी आणि पालिका प्रशासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्तेच प्रकल्पांचे उद्घाटन करण्यासाठी आग्रही दिसते. त्यामुळेच पाण्यासारख्या महत्वाचा प्रकल्पाचा उद्घाटनही रखडल्याचे दिलते. नेत्यांना वेळ नसल्याने जनतेला वेठीस धरले जात असल्याने संताप व्यक्त केला जात आहे.

जलशुद्धीकरण केंद्र, निघोजेतील जॅकवेलच्या उद्घाटनाबाबत आयुक्त, अतिरिक्त आयुक्तांना विचारल्यावर नो-कॉमेंटस् एवढचे ते वेळ मारुन नेते आहेत. त्याचबरोबर बहुचर्चित तारागंण प्रकल्प, निगडी प्राधिकरणातील गदिमा नाट्यगृह, शहरातील विविध चौकातील शिल्प, मोशी अग्निशमन केंद्र, इंद्रायणीनगर उद्यान व विरंगुळा केंद्राचे उद्‌घाटन आणि अमृत प्रकल्पातील एसटीपी, जिजाऊ क्‍लिनिकचे भूमिपूजन रखडले आहे.