नेत्यांच्या तोफा शहरात धडाडण्यास सुरुवात

0
45

पिंपरी, दि. 07 (पीसीबी) : पिंपरी, चिंचवड, भोसरी आणि मावळ मतदारसंघात दुरंगी लढत होत आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीच्या वतीने प्रचाराचे जोरदार नियोजन करण्यात आले आहे. बुधवारपासूनच नेत्यांच्या तोफा पिंपरी-चिंचवड शहरात धडाडण्यास सुरुवात झाली आहे.

शहरात पिंपरी, चिंचवड आणि भोसरी असे तीन विधानसभा मतदारसंघ आहेत. शहराच्या सीमेवर मावळ मतदारसंघ आहे. प्रचारासाठी आता केवळ बारा दिवस उरले आहेत. त्यामुळे रिंगणातील उमेदवार आणि कार्यकर्ते प्रचारात गुंतले आहेत. महाविकास आघाडी आणि महायुतीने निवडणूक प्रचारासाठी नेत्यांना बोलावले आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात मोठ्या प्रमाणावर कामगारवर्ग वास्तव्यास आहे. राज्याच्या आणि देशाच्या विविध भागांतून नागरिक नोकरी, उद्योग-व्यवसायाच्या निमित्ताने आले आहेत. वेगवेगळ्या भागातील मतदारांवर प्रभाव टाकण्यासाठी त्यांच्या भागातील नेत्यांच्या सभा आणि बैठकांचे आयोजन करण्यात आले आहे.

भाजपच्या वतीने बुधवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा पार पडली.. त्याचबरोबर भोसरीत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, पंकजा मुंडे आदी नेत्यांच्या सभा होणार आहेत, असे पक्षाचे प्रवक्ते राजू दुर्गे यांनी सांगितले.

काँग्रेसच्या वतीने प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, सतेज पाटील, खासदार प्रणिती शिंदे, खासदार विशाल पाटील, अमित देशमुख यांच्या सभा होणार आहेत, अशी माहिती काँग्रेसचे शहराध्यक्ष कैलास कदम यांनी दिली.

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या यतीने पक्षाध्यक्ष शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार सुप्रिया सुळे, खासदार डॉ. अमोल कोल्हे, माजी खासदार श्रीनिवास पाटील, रोहित पवार यांच्या सभा होणार आहेत, अशी माहिती शहराध्यक्ष तुषार कामठे यांनी दिली.

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या यतीने उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या सभा होणार आहेत. त्याचबरोबर इतर नेत्यांनाही निमंत्रित करणार असल्याचे सांगण्यात आले.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने सभांचे नियोजन सुरू असल्याचे शहरप्रमुख सचिन भोसले यांनी सांगितले. शिवसेना एकनाथ शिंदे गटाच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि इतर नेत्यांना प्रचारासाठी आणणार असल्याचे सांगण्यात आले आहे.