नेटिझन्स म्हणतात… धनुष्यबाण शिवसेनेचाच, ऑनलाईन सर्वेक्षणातील निष्कर्ष

0
205

मुंबई, दि. ७ (पीसीबी) : खरी शिवसेना कोणाची? धनुष्य बाण हे शिवसेनेचे अधिकृत निवडणूक चिन्ह कोणाला जाणार, याची उत्तरं निवडणूक आयोगाकडून लवकरच मिळणार आहेत. निवडणूक आयोग मुख्यमंत्री एकनाथ शिंदे किंवा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यापैकी एका गटाला धनुष्य बाण देणार की चिन्ह गोठवणार, याची उत्सुकता राजकीय वर्तुळाला लागली आहे. मात्र धनुष्य बाण हे चिन्ह कोणाला जावं, याबाबत सर्वसामान्य जनतेच्या मनात काय सुरु आहे, हे जाणून घेण्याचा प्रयत्न ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’च्या टीमने केला आहे.

“धनुष्यबाण चिन्हावर निवडणूक आयोगासमोर सुनावणी होत आहे, धनुष्यबाण चिन्ह कोणाला मिळायला हवे असे तुम्हाला वाटते?” असा प्रश्न मटा ऑनलाईनच्या ट्विटर हँडलवरुन विचारण्यात आला होता. या पोलवर ९०० ट्विटराईट्सनी प्रातिनिधिक मतदान केले. 74.4 टक्के नेटिझन्सच्या मते धनुष्य बाण हे चिन्ह शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना मिळायला हवे, तर केवळ 25.6 टक्के नेटिझन्सना ते एकनाथ शिंदे यांना मिळावे असे वाटते.

‘धनुष्यबाण हे चिन्ह मूळ शिवसेनेला मिळणे न्यायिक दृष्ट्या योग्य वाटते’, असं मत कोणी व्यक्त केलं आहे. तर ‘स्वतःचा पक्ष काढा आणि लढा, उगाच दुसऱ्याचे चिन्ह का चोरताय?’ असा प्रश्न काही जणांनी उपस्थित केला आहे, तर ‘तीनदा मुदतवाढ देऊनही उद्धव ठाकरे गट कसलेही पुरावे सादर करू शकलेला नाही. शिंदेंनी सगळे पुरावे दिले आहेत’ याकडे कोणी अंगुलीनिर्देश केला आहे. तर ‘दोघांनाही मिळणार नाही, गोठवलं जाईल’ असं मत कोणी ट्विटरवर व्यक्त केले आहे.

एखाद्या पक्षात फूट पडली, तर निवडणूक आयोग दोन्ही बाजूंच्या दाव्यांची तपासणी करुन दोन निकषांच्या आधारे आपला निकाल देतो. पहिली गोष्ट म्हणजे कुठल्या गटाकडे आमदार आणि खासदारांचे बहुमत आहे. तर दुसरी बाब म्हणजे पक्षाच्या संघटनात्मक बांधणीत कोणाच्या बाजूने बहुमत आहे. निवडणूक आयोग ‘चिन्ह आदेश १९६८’च्या अंतर्गत निर्णय देतो. कलम १५ नुसार निवडणूक आयोग पक्षाचे चिन्ह ठरवतो. विविध गटांतील स्थिती, पदाधिकाऱ्यांचे संख्याबळ, आमदार-खासदार यांच्या आधारे निर्णय घेतला जातो, असं निवडणूक आयोगाचे माजी आयुक्त एस. वाय. कुरेशी यांनी सांगितलं.

उल्लेखनीय गोष्ट म्हणजे निवडणूक आयोगाचा निर्णय सर्व वर्ग आणि गटांना बंधनकारक असतो. म्हणजेच तो ठाकरे किंवा शिंदे या दोन्ही गटांना अमान्य करुन चालणार नाही. कौटुंबिक मालमत्तेच्या बाबतीत न्यायालय विभाजनाचे आदेश देते. पण पक्षांच्या बाबतीत तसे करता येत नाही. निवडणूक आयोग ज्या गटाला मुख्य पक्ष म्हणून घोषित करेल, त्या पक्षाचे नाव, चिन्ह आणि संपत्ती सर्व त्याच्याकडे जाईल. निवडणुका काही दिवसांवर येऊन ठेपल्या असतील, तर निवडणूक आयोग प्रमुख पक्षाचे चिन्ह गोठवतो. यानंतर दोन्ही गटांना पक्षाची नवीन चिन्हे देण्यात येतात.

निवडणूक आयोग धनुष्यबाण चिन्ह ठाकरे किंवा शिंदे यापैकी एका गटाला देण्याचा निर्णय घेऊ शकतात किंवा पक्षचिन्ह गोठवण्याचा निर्णय घेऊ शकतात, तसं झाल्यास दोन्ही गटांना नवीन चिन्हं दिले जाईल. हा निर्णय शिंदेंसाठी तितकासा फटका बसणारा नसला, तरी उद्धव ठाकरेंना मोठा हादरा बसू शकतो.