नुपूर शर्मा यांना देवेंद्र फडणवीस म्हणाले होते… काळजी करु नको बेटा आम्ही तुझ्यासोबत आहोत…

0
410

मुंबई, दि. ७ (पीसीबी) – प्रेषित मोहम्मद यांच्याबद्दल अवमानकारक वक्तव्य केल्याने प्रवक्त्या नुपूर शर्मा यांना भाजपाने रविवारी निलंबित केलं. मात्र यानंतरही या प्रकरणावरुन इस्लामी देशांत तीव्र पडसाद सुरूच आहेत. असं असतानाच आता काही दिवसांपूर्वी नुपूर यांनी दिलेल्या मुलाखतीमधील काही भाग व्हायरल होत आहे. मे महिन्यात शेवटच्या आठवड्यात नुपूर यांनी ही मुलाखत दिली होती. यावेळी त्यांनी आपल्या वक्तव्यांनंतर धमक्या येऊ लागल्यानंतर पक्षाचे वरिष्ठ नेते ज्यामध्ये अगदी पंतप्रधान कार्यालय, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि पक्षाकडून आपल्याला समर्थन मिळत असल्याचा दावा केला होता. विशेष म्हणजे या मुलाखतीमध्ये नुपूर यांनी महाराष्ट्राचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनीही आपल्याला पाठिंबा दर्शवण्यासाठी फोन केल्याचा दावा केला होता.

कोणी काहीही बोलू दे अमित शाह…
३१ मे २०२२ रोजी युट्यूबवर नुपूर यांच्या या मुलाखतीचा व्हिडीओ पोस्ट करण्यात आलाय. या मुलाखतीदरम्यान तुम्हाला देण्यात येणाऱ्या धमक्यांच्या पार्श्वभूमीवर भाजपाच्या नेत्यांकडून समर्थन मिळताना दिसत नाहीय. याबाबत तुमचं काय म्हणणं आहे?, असा प्रश्न नुपूर यांना विचारण्यात आला होता. त्यावर उत्तर देताना नुपूर यांनी, “मी माझ्या वरिष्ठ नेतृत्वाची यासाठी आभारी आहे. हे प्रकरण जास्त तापल्यानंतर शुक्रवारी सायंकाळी मला सर्वात आधी केंद्रीय गृहमंत्र्यांच्या कार्यालयातून फोन आला होता. ते आजही बाहेर आहेत पण मी कायम त्यांच्या कार्यालयाच्या संपर्कात असते. कोणी काहीही बोलू दे पण मला माहितीय की केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे त्यांच्या कार्यकर्त्यांच्या आरोग्याबद्दल आणि सुरक्षेबद्दल काळजी करतात. विशेष करुन या प्रकरणामध्ये मला आणि माझ्या कुटुंबीयांना धमकावण्यात आलंय. मी दिल्लीच्या पोलीस आयुक्तांची भेट घेतली. तसेच काही सुत्रांकडून या धमक्या केवळ सोशल मीडियावरच्या नसल्याची माहितीही मिळाली,” असं उत्तर दिलं. “मी पक्षाध्यक्षांच्या कार्यालयाशीही संपर्कात आहे. तसेच मी गौरव भाटिया यांचीही आभारी आहेत. ते नुकतेच आमच्यासोबत काम करु लागले आहेत. ते पहिले व्यक्ती होते ज्यांनी उघडपणे मला पाठिंबा दिला. व्यक्तीस्वातंत्र्याचा आपल्याला अधिकार आहे. मी हेटस्पीचबद्दल बोलत नाहीय मी व्यक्तीस्वातंत्र्याबद्दल बोलतेय,” असं नुपूर शर्मा यांनी सांगितलं.

फडणवीस यांचा फोन आल्याचा केला दावा
पुढे बोलताना नुपूर यांनी थेट रझा अकादमीचा उल्लेख करत, “आझाद मैदानमधील दंगलीसाठी आणि अमर जवान ज्योतीला नुकसान पोहचवण्यासाठी कुप्रसिद्ध असलेली रझा अकादमी माझ्याविरोधात एफआयआर दाखल करु शकते,” असं नुपूर म्हणाल्या. यानंतर नुपूर यांनी देवेंद्र फडणवीस यांचं नाव घेतलं. ओपइंडियाच्या युट्यूब चॅनेलवर ३१ मे रोजी अपलोड करण्यात आलेल्या नुपूर यांच्या मुलाखतीच्या व्हिडीओमध्ये १८ मिनीटं ४० सेकंदाला नुपूर यांनी देवेंद्र फडणवीसांचा उल्लेख केल्याचं दिसून येतं.

“देवेंद्र फडणवीस यांनी कॉल केला आणि म्हणाले, काळजी करु नको बेटा आम्ही तुझ्यासोबत आहोत. आम्ही सर्व तुझ्यासोबत आहोत, असं नुपूर म्हणाल्या. सध्या या वक्तव्याचा व्हिडीओ ट्विटवरुरनही विरोधकांनी व्हायरल केलाय.

याच मुलाखतीमध्ये पुढे बोलताना, “वरिष्ठ नेतृत्व मग ते पंतप्रधानांचं कार्यालय असो, गृहमंत्र्यांचं कार्यालय असो किंवा पक्षाध्यक्षांचं कार्यालय असो ते माझ्या पाठिशी आहेत,” असंही नुपूर म्हणाल्या होत्या.