नुकसान भरपाई मागितल्याने हवेत गोळीबार

0
341

चाकण, दि. २३ (पीसीबी) – खेड तालुक्यातील नाणेकरवाडी येथे एकाने किरकोळ कारणावरून वाद घालत हवेत गोळीबार केला. ही घटना सोमवारी (दि. २०) सायंकाळी साडेसहा वाजता घडली.

अक्षय उर्फ ईश्वर गोविंदा पाटील (रा. नाणेकरवाडी, ता. खेड) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस हवालदार संतोष सुपेकर यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बाबू उर्फ रावसाहेब बाबासाहेब नाणेकर (वय ३४), उमेश बाबासाहेब नाणेकर (वय ३२), दिनेश रमेश नाणेकर (वय ३०) यांच्या गाडीचे पाच महिन्यापूर्वी आरोपी अक्षय याच्याकडे काम करणारा करण बोजे याने नुकसान केले. त्याचे पैसे नाणेकर यांनी मागितले असता त्यातून नाणेकर आणि बोजे यांच्यात किरकोळ वाद झाला. त्या कारणावरून अक्षय याने दिनेश नाणेकर यांना शिवीगाळ, दमदाटी करून पिस्टलचा धाक दाखवला. त्यांच्या अंगावर आरोपी धावून गेला. त्यामुळे बाबू नाणेकर आणि उमेश नाणेकर ते भांडण सोडविण्यासाठी गेले असता अक्षय याने त्याच्याकडील पिस्टल मधून हवेत गोळीबार केला आणि दहशत निर्माण करून पळून गेला. चाकण पोलीस तपास करीत आहेत.