निवडणूक बंदोबस्तावरील पोलिसाला नेले फरकटत

0
71

भक्ती शक्ती चौकातील घटना

निगडी, दि. १६ (पीसीबी)

एका वाहन चालकाला निवडणूक बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांनी थांबविण्याचा इशारा केला असता वाहन चालकाने दोन पोलिसांना धडक देऊन एकास फरफटत नेले. ही घटना भक्ती शक्ती चौक निगडी येथे शुक्रवारी (दि. 15) मध्यरात्री घडली.

संतोष सावळेराम शिंदे, श्याम पंढरीनाथ लोणारकर अशी जखमींची नावे आहेत. शिंदे यांनी याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार कार (एमएच 12/एचएन 2458) चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी संतोष शिंदे हे पिंपरी चिंचवड पोलीस मुख्यालयात नेमणुकीस आहेत. संभाव्य अनुचित प्रकार टाळण्यासाठी निवडणूक विभाग व पोलिसांकडून निगडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत भक्ती शक्ती चौक येथे वाहन तपासणी पथक तैनात केले आहे. त्या पथकाचे प्रमुख श्याम लोणारकर असून संतोष शिंदे हे या पथकात बंदोबस्तासाठी हजर होते.

शुक्रवारी मध्यरात्री साडेबारा वाजताच्या सुमारास एक वाहन (एमएच 12/एचएन 2458) भरधाव वेगात आले. त्यामुळे पथकाने वाहन चालकाला थांबण्यास सांगितले. मात्र वाहन चालकाने वाहन न थांबवता बॅरिकेटला धडक देऊन संतोष शिंदे यांना वीस फुटापर्यंत फरफटत नेले. तसेच श्याम लोणारकर यांना जखमी केले. यानंतर संबंधित वाहन चालक घटनास्थळावरून पळून गेला. निगडी पोलीस तपास करीत आहेत.