निवडणूक निर्णय अधिकारी अनिल पवार यांनी घेतला तपासणी नाक्यांवरील कामकाजाचा आढावा

0
67

थेरगाव,दि. 24 (पीसीबी) : विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने आचारसंहितेच्या कालावधीत संशयित वाहनांची तपासणी करून संबधितांवर भारत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार आवश्यक ती कारवाई करावी, असे निर्देश चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी अनिल पवार यांनी दिले.

विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने संपुर्ण महाराष्ट्रात आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. चिंचवड विधानसभा मतदारसंघात फिरती सर्वेक्षण पथके (एफएसटी) आणि स्थिर सर्वेक्षण पथके (एसएसटी) तैनात करण्यात आली आहेत. या पथकांद्वारे निवडणुकीतील पैशाचा वापर, अंमली पदार्थ, मद्य, मौल्यवान धातू यांची जप्ती आदी बाबींची तपासणी करण्यात येत आहे. या प्रक्रियेचा निवडणूक निर्णय अधिकारी अनिल पवार यांनी तपासणी नाक्यांना (चेक पोस्ट ) प्रत्यक्ष भेट देऊन आढावा घेतला.

यावेळी चिंचवड विधानसभा मतदारसंघ निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयातील आचारसंहिता कक्षाचे प्रमुख राजेंद्र डुंबरे, सहाय्यक समन्वय अधिकारी संदीप वैद्य तसेच निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयातील विविध कक्षांचे समन्वय अधिकारी, कर्मचारी, पथकातील जवान व पोलीस अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

निवडणूक निर्णय अधिकारी अनिल पवार यांनी औंध-सांगवी, वाकड पोलीस स्टेशन, काळा खडक – भुमकर चौक, मुकाई चौक या तपासणी नाक्यांवर प्रत्यक्ष भेट देऊन पथकांद्वारे करण्यात येणाऱ्या कामकाजाचा आढावा घेतला तसेच त्यांना विविध सूचना देखील यावेळी केल्या.
चिंचवड विधानसभा मतदारसंघात एकूण १२ स्थिर सर्वेक्षण पथके तर ९ फिरती सर्वेक्षण पथके तैनात करण्यात आली आहेत. या पथकांद्वारे तीन शिफ्टमध्ये मतदारसंघातील विविध ठिकाणी तपासणी करण्यात येत असून त्यामध्ये पोलीस यंत्रणेचाही सहभाग आहे.