मुंबई, दि. १६ (पीसीबी) – आगामी लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील कोणत्या पक्षाच्या किती जागा निवडून येणार? हे जाणून घेण्यासाठी सर्वांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. गेल्या वर्षभरापासून भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील मित्रपक्षांनी ‘मिशन 45’ चा नारा दिला होता. मात्र, एबीपी माझा आणि सी व्होटर्सच्या ओपिनियन पोलनुसार, महायुतीचे ‘मिशन 45’ सपशेल भंगणार असल्याचे चित्र दिसत आहे. कारण आगामी ओपिनियन पोलनुसार, भाजप आणि मित्रपक्षांना म्हणजेच एनडीएला महाराष्ट्रात केवळ 28 जागांवर विजय मिळवता येऊ शकेल.
महाविकास आघाडीला किती जागा?
महायुतीचे मिशन 45 भंगणार असे चित्र ओपीनियन पोलमध्ये दिसत आहे. महाराष्ट्रात महायुतीचा 28 जागांवर तर महाविकास आघाडीचा 20 जांगावर विजय होईल, असा अंदाज ओपिनियन पोलमधून व्यक्त केला जातोय. महाविकास आघाडीला 20 जागा मिळण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडीत काँग्रेस पक्षाला 4 जागा तर शरद पवार यांची राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना या दोन्ही पक्षांना मिळून 16 जागा मिळतील, असा अंदाज एबीपी माझा आणि सी व्होटर्सच्या ओपीनियन पोलमधून व्यक्त करण्यात आलाय.
भाजपला किती यश मिळणार?
ओपीनियन पोलनुसार, भारतीय जनता पक्षाला 22 जागा मिळण्याची शक्यता आहे. तर महायुतीचा भाग असलेल्या शिवसेना आणि राष्ट्रवादीला मिळून 6 जागा मिळण्याची शक्यता आहे. म्हणजेच एनडीएचा 28 जागांवर विजय होऊ शकतो. तर महाविकास आघाडी आगामी लोकसभा निवडणुकीत महायुतीला तगड आव्हान उभे करणार असल्याचे चित्र दिसत आहे. या आकडेवारीनुसार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पदरी अपयश पडणार असल्याचे चित्र ओपिनियन पोलमध्ये दिसत आहे.
उद्धव ठाकरे आणि शरद पवारांना सहानुभूतीचा फायदा होणार ?
शिवसेनेत 2022 मध्ये एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केली तर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये 2023 मध्ये अजित पवार यांनी बंडखोरी केली. त्यानंतर निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे यांना शिवसेना नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह दिलं. तर अजित पवारांच्या बाबतीतही असचं घडल. अजित पवारांना राष्ट्रवादी काँग्रेस हे नाव आणि घड्याळ हे चिन्ह देण्यात आलं. त्यामुळे या सर्व घडामोडींमुळे शरद पवार आणि उद्धव ठाकरेंचे पक्षातील सहकारी त्यांना सोडून गेले. त्याची सहानुभूती शरद पवार आणि उद्धव ठाकरेंना मिळणार का? असा प्रश्न सध्या उपस्थित केला जातोय.