निवडणूक काळात आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्यांवर प्रचलित कायद्यानुसार करवाई

0
67

– ॲडमिनही अडचणीत येऊ शकतो
– पोलिस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी दिले कारवाईचे आदेश

पिंपरी, दि. 07 (पीसीबी) : आपल्या उमेदवाराचे समर्थन करत असताना जर तुम्ही सोशल मीडियावर समोरच्या उमेदवाराबाबत आक्षेपार्ह, बदनामीकारक तसेच राजकीय व धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या पोस्ट करत असाल, तर जरा सावध व्हा..! कारण तुमच्या या कृत्यामुळे तुमच्यासह संबंधित ग्रुपचा ॲडमिनही अडचणीत येऊ शकतो. निवडणूक काळात अशा प्रकारच्या पोस्ट करणाऱ्यांवर प्रचलित कायद्यानुसार करवाई करण्याचे आदेश पोलिस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी दिले आहेत. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूकीसाठी निवडणूक आयोगाकडून तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. दरम्यान, राज्यात आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. २० नोव्हेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार असून २३ नोव्हेंबर मतमोजणी होणार आहे.

निवडणूकांच्या तारखा जाहीर झाल्यापासून राज्यभर निवडणूकीचे वातवरण तापले आहे. एकमेकांवर आरोपांची राळ उडवण्यात येत आहे. कार्यकर्ते सोशल मीडियावर आक्रमक होत आहेत. काहीजण कसलेही भान न ठेवता पोस्ट करत आहेत. ज्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी सोशल मीडियावर वॉच ठेवण्याचे आदेश दिले आहेत. तसेच, आक्षेपार्ह, बदनामीकारक आणि राजकीय तसेच जातीय तेढ निर्माण करणाऱ्या कार्यकर्त्यांवर प्रचलित कायद्यानुसार करवाई करण्याच्या सूचना चौबे यांनी केल्या आहेत.

उमेदवार किंवा निवडणूक प्रक्रियेसंदर्भात आक्षेपार्ह संदेश, छायाचित्र, खोट्या बातम्या, अफवा, खोटी माहिती सोशल मिडियावर प्रसारीत होत असल्याचे निदर्शनास आल्यास त्याबाबतची माहिती पोलीस प्रशासनास देणे, हे भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, २०२३ चे कलम ३३ नुसार प्रत्येकाचे कर्तव्य आहे. निवडणूक काळात नागरिकांनी आपले कर्तव्य चोख बजावून प्रशासनाला सहकार्य करणे अपेक्षित आहे. व्हाट्स अप गृपवर बदनामीकारक, प्रक्षोभक, आक्षेपार्ह, मिम्स शेअर केले जातात. अशा वेळी गृप अडमीनने तत्काळ संबंधित मिम्स डिलीट कराव्यात. तसेच, ग्रुपमध्ये सर्व सदस्यांसाठी नियमावली आखून द्यावी. नियम न पाळणाऱ्या सदस्यांची गृपमधून हकालपट्टी करावी. जेणेकरून अडमीन अडचणीत येणार नाही.

एखादी व्यक्ती खोडसाळपणे राजकीय व्यक्ती, राजकीय पक्ष किंवा निवडणूक प्रक्रिया यांना लक्ष्य करीत असल्याचे आपल्या निदर्शनास आल्यास त्याबाबत नजीकच्या पोलीस ठाणे किंवा पोलीस नियंत्रण कक्षास माहिती द्यावी. ग्रुप अॅंडमिन या नात्याने आपल्या ग्रुपवरून कोणत्याही प्रकारची अफवा प्रसारीत होणार नाही, याबाबत खबरदारी घ्यावी. निवडणक आयोगाने जारी केलेल्या सर्व मार्गदर्शेक तत्त्वांचे पालन करावे.

निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाकडून निगराणी ठेऊन कायदेशीर कडक कारवाई करण्यात येणार आहे. सोशल मीडियावर अफवा, बदनामीकारक, आक्षेपार्ह संदेश, छायाचित्र आणि खोट्या बातम्या प्रसारीत करणाऱ्यावर भारतीय न्याय संहिता, माहिती तंत्रज्ञान अधिनियम, लोकप्रतिनिधी कायदा व इतर प्रचलित कायद्यानुसार कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत, अशी माहिती पोलिस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी दिली.