निवडणूक काळातील संशयित व्यवहारांवर आरबीआयचे लक्ष

0
131

निवडणुकीच्या काळात रुपये, पैशांची हेराफेरी मोठ्या प्रमाणात वाढते. मतदारांना पैशांचे आमिष दाखविण्यात येते. काही ठिकाणी युपीआयच्या माध्यमातून मोठ-मोठ्या रक्कमा अथवा छोट्या रक्कमा पाठविण्यात येतात. खात्यातील या व्यवहारांवर केंद्रीय रिझर्व्ह बँकेची करडी नजर आहे. त्यांनी पेमेंट कंपन्यांना याविषयीच्या व्यवहारांवर लक्ष ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे या निवडणुकीच्या काळात दादा-भाऊच्या सांगण्यावरुन अनोळखी क्रमांकावर रक्कम हस्तांतरीत करण्याचा उपद्व्याप अंगलट येऊ शकतो.

निवडणूक काळातील संशयित व्यवहारांवर आरबीआयचे लक्ष असेल. तसेच अनेक छोट्या-छोट्या व्यवहारांवर पेमेंट कंपन्यांचे लक्ष असेल. याविषयीचे निर्देश केंद्रीय बँकेने 15 एप्रिल रोजी पेमेंट कंपन्या आणि बँकांना दिले आहेत. त्यानुसार, पेमेंट प्रणालीआधारे मतदारांना प्रभावित करण्याचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष प्रयत्न रडारवर येणार आहे. उमेदवार त्यांच्या कार्यकर्त्यांना मतदारांना प्रभावित करण्यासाठी डिजिटल यंत्रणेचा दुरुपयोग करु शकतात. इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफरचा दुरुपयोग थांबविण्यासाठी आरबीआय प्रत्येक व्यवहारावर करडी नजर ठेवून आहे.

दादा, भाऊच्या सांगण्यावरुन अनेक क्रमांकावर, अनोळखी क्रमांकावर पेमेंट करु नका. छोट्या छोट्या रक्कमांवर सुद्धा आणि तुमच्या पेमेंट हिस्ट्रीवर पेमेंट कंपन्यांचे बारीक लक्ष आहे. त्यामुळे नाहक चौकशीचा ससेमीरा मागे लागू शकतो. तेव्हा सावध राहा. यापूर्वी कधीही ज्या क्रमांकावर तुम्ही व्यवहार केलेला नाही. तसेच ओळखीच्या क्रमांकावर अधिक व्यवहार दिसल्यास चौकशीचा ससेमिरा मागे लागू शकतो. अशा कोणत्याही प्रकारच्या व्यवहारांची माहिती पेमेंट कंपन्यांना आरबीआयला द्यायची आहे. तसेच अशा व्यवहारांची यादी, क्रमांक आणि समोरील व्यक्तीची माहिती याविषयीचा अहवाल सादर करण्यास सांगण्यात आला आहे. फिनटेक कंपन्या, ॲग्रिगेटर आणि मोबाईल वॉलेट कंपन्या निवडणूक काळातील या प्रकारच्या व्यवहारांची माहिती, अहवाल सादर करणार आहेत.