निवडणूक आयोगाने शिवसेनेचं चिन्ह गोठवल्यानंतर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया

0
344

मुंबई, दि. ८ (पीसीबी) : शिवसेनेचे ‘धनुष्य-बाण’ हे निवडणूक चिन्ह गोठवण्याचा हंगामी आदेश केंद्रीय निवडणूक आयोगाने शनिवारी रात्री उशिरा जारी केला. या आदेशामुळे उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे या दोन्ही गटांना अंधेरी-पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत शिवसेनेच्या चिन्हाचा वापर करता येणार नाही. आयोगाचा हा निर्णय ठाकरे गटासाठी धक्कादायक असून त्याविरोधात न्यायालयात दाद मागितली जाण्याची शक्यता आहे. न्यायालयाच्या या निर्णयामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ माजली आहे. कालपासून विविध नेत्यांच्या प्रतिक्रियाही समोर येत आहेत.

शिवसेना नेते आदित्य ठाकरेंनी देखील काल ट्वीट करत प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. यानंतर सर्वांना उत्सुकता होती ती शिवसेने पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या प्रतिक्रियेची, अखेर उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर प्रतिक्रिया व्यक्त केल्याचे दिसत आहे.उद्धव ठाकरे यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो शेअर करत, ‘जिंकून दाखवणारचं’ अशी दोनच शब्दात प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

केंद्रीय निवडणूक आयोगाच्या कार्यालयात काल (शनिवार) चार तास झालेल्या बैठकीनंतर, शिवसेनेचे निवडणूक चिन्ह गोठवण्याचा निर्णय घेण्यात आला. शिवसेना हे पक्षाचे मूळ नाव वापरण्यासही दोन्ही गटांना मनाई करण्यात आली आहे. आता दोन्ही गटांना स्वत:च्या पक्षासाठी नव्या नावाची आणि नव्या निवडणूक चिन्हाची निवड करावी लागणार आहे. सोमवारी, १० ऑक्टोबरला दुपारी १ वाजेपर्यंत नाव आणि चिन्हांचे तीन पर्याय आयोगाकडे सादर करण्याचा आदेशही देण्यात आला आहे. निवडणूक आयोगाचा हा निर्णय ठाकरे गटासाठी धक्कादायक असून त्याविरोधात न्यायालयात दाद मागितली जाण्याची शक्यता आहे.

शिवसेनेच्या काही नेत्यांनी शिवसेना (बाळासाहेब ठाकरे किंवा महाराष्ट्र )अशी काही पर्यायी नावे आणि काही निवडणूक चिन्हांचा अंधेरी पोटनिवडणुकीसाठी विचार केला जाईल, असे संकेत दिले आहेत. उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत रविवारी याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या समर्थक खासदार-आमदारांची रविवारी सायंकाळी बैठक आयोजित केली आहे.